आमचे उस्तव... अखंड ऊर्जा स्त्रोत
*आमचे उस्तव... अखंड ऊर्जा स्त्रोत* *नवरात्रोत्सव* उद्यापासून नवरात्रोत्सव सुरू होत आहे. शारदीय नवरात्रीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. मातृशक्तीची उपासना म्हणजे नवरात्र,एका अनाहुत सकारात्मक ऊर्जेचा आविष्कार आणि संचार म्हणजे नवरात्र. सज्जनांसाठी आश्वासकता आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठीची कटीबद्धता म्हणजे नवरात्र. सातत्य, साधना, स्नेह, समर्पण ,सेवा या सगळ्यातून आपली सामाजिक आणि कौटुंबिक भूमिका बजावणाऱ्या मातृशक्तीच्या रौद्ररूपाची आठवण म्हणजे नवरात्र. कंटाळवाणा पावसाळा संपत आलेला असतो. निसर्ग विविधतेने नटलेला, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांमध्ये एक आनंद ओसंडून वाहत असतो, नद्या,नाले दुथडी भरून वाहत असतात. चैतन्य स्वरूप विश्वाच्या कणाकणामध्ये व्यापून उरते. संततधार ,पावसाळा यामुळे थकवा आलेले शरीर पुन्हा पूर्वपदावर येत असते. मंदावलेला जठराग्नी पुन्हा हळू हळू जागृत होऊ लागतो. काळोखाचे साम्राज्य बुडवून दिनकर पुन्हा नित्य नियमाने दर्शन देऊ लागतो. पिकं बाहेर डोकावून पाहत आहेत. सकाळी, संध्याकाळी उबदार, दुपारी गरम तर रात्री आणि पहाटे थंडगार वातावरण आहे. जनावरांसाठी भरपूर हिरवा चारा उपलब्ध आहे. पावसान...