लाजबाब क्या भात है...


 बायकांना स्वतःचं सुख समजतच नाही हेच खरे.  रोज रोज सगळा स्वयंपाक कशाला करायचा ?  फक्त भात लावत जावा असे सांगून सांगून मी थकलो आहे. 

खरं तर भाताशी एकनिष्ठ असणारे आम्ही केवळ भातावर आयुष्यभर सुखी राहू शकतो. जेवताना ताटात मध्ये भात असलाच पाहिजे. 

दक्षिणेतल्या सारखा भाताचा डोंगर नसला तरी निदान नजरेला कंजूशी जाणवायला नको ईतका मात्र हवा.  मूद, लिंबाएवढा भात असे शब्दप्रयोग आणि औपचारिकता भातप्रेमींच्या शब्दकोशात नाहीच मुळी.भाताबरोबर  कोणाचीही युती अगदी सहजपणे होते..

म्हणजे वरण, आमटी, पातळ भाजी, टॉमेटो सार, उडदाचे घुटे, कढी, ताक, दूध, दही कशाचीही.

 याबरोबर पान शोभेला कितीही जण असले तरी भाताचे स्थान हे मुख्यच राहते त्यामुळे भातावर काहीच परिणाम होत नाही. पापड, कुरडई, तळण, विविध  प्रकारच्या सुक्या भाज्या, कोशिंबिरी, चटण्या, सलाड असे अनेकजण जणू काही आपल्या उपस्थितीमुळे त्या परब्रह्माची (भाताची) आराधना करतानाच त्याच्याशी आपली जवळीक सिद्ध करण्याचा प्रयत्न करत असतात.

पण अशा भाऊ गर्दीला कंटाळून हे परब्रह्म काही वेळा एकटेपणा पसंत करते आणि केवळ एक दोन जणांना सोबत घेते आणि जठराग्नीला तृप्त करते. मग कधी तूपमीठ भात,   मेथकुट भात अशी युती होते.  कधीतरी दूध भात आणि साखर असा बेत  चांगला वाटतो.

कधी कधी  ताटाचा कंटाळा येतो आणि मग हे पक्वान्न डिश ,प्लेट यामध्ये विराजमान होते. मग कधीं जिरा भात, फोडणीचा भात, पुलाव अशा रुपात तर कधी शेजवान भाताच्या रुपात प्रकट होतो.

यामध्ये  ईतकी विविधता आहे की याला एकसारखेपणा म्हणणारांच्या बुद्धीची कीव करावी वाटते. कितीतरी प्रकारचे तांदूळ आणि तितक्याच प्रकारचा भात. प्रत्येक प्रकार आपली ओळख पटवून देतो. आंबेमोहोर, बासमती, कोलम, इंद्रायणी , उकडा, काळी साळ, जिरगा असे बरेच प्रकार आहेत. आंबेमोहोर आणि इंद्रायणी चा वाफेचा वरण भात म्हणजे पर्वणी. पण तरीही पक्का भात प्रेमी यांची तुलना करायच्या फंदात पडत नाही. मसालेभातासाठी शक्यतो कोलम  वापरला जातो. पुलाव साठी बासमती उत्तम. 

मसाले भात आटोपशीर करता व वाढता आला तरच रुचतो. भाज्या योग्य आकारात चिरलेल्यां व शिजलेल्या असल्या पाहिजेत. शेंगदाणे, काजू, तोंडली, ढब्बू मिरची, फ्लॉवर हे सगळे हवेच, पण प्रमाणात त्याचा अतिरेकही नको. आणि भात सुद्धा फार गचका किंवा  फार फडफडीत नसावा.  वाढताना गरमच वाढवा. त्याच्यावर ओले खबरे कोथिंबीर आणि तुपाची धार हवी. मसालेभात शक्यतो विचारूनच वाढवा कारण आजकाल समारंभामध्ये बरेचवेळा भरीचा पदार्थ म्हणून याचा वापर करतात व उगीचच हा पदार्थ बदनाम होतो. 

दही भात नावाच्या पक्वान्नाला तोडच नाही. घट्ट साईचे दही, थोडासा सुटा आंबेमोहोर चा थंड झालेला भात, त्यात  दूध मिसळून त्याला फुगू द्यायचे  परत दूध घालून सरसरीत करायचा मग खाताना ऐनवेळी त्यात घट्ट साईचे दही घालायचे. साजूक तूप, जिरे, उसळी मिरची याची फ़ोडणी. चवीपुरते मीठ, साखर... आणि या फोडणीत शेंगदाणे तळून घालायलाच हवेत. काहीजण काजू, तुटी फ्रुटी , काकडीचे तुकडे , डाळिंबाचे दाणे सुद्धा घालतात पण अट्टल भातप्रेमीला ही भेसळ असल्यासारखे वाटते. 

खरं तर सगळेच पदार्थ मी आवडीने खातो. माझ्याकडे केवळ बघूनच याची खात्री नक्की पटते. पण आयुष्यात मी साखरभात खातो फक्त आईच्याच हातचा. तो खाल्यावर जगातले सगळ्यात श्रेष्ठ पक्वान्न म्हणजे साखरभात.  काजू,  बेदाणे , केशर, लवंग युक्त भात आई उत्तम करते. तो परतत असताना त्याचा लांबपर्यंत वास येतो. याच्या सारखाच पण नारळ आणि गूळ घालून केलेला नारळीभात त्यावर तुपाची धार धरून ताव मारायला जी मजा येते ती कशातच नाही. पावसाळी वातावरणात हा भात खायला जास्तच मजा येते. बाहेर जोराचा पाऊस सुरू असताना शेकत शेकत गुरगुट भात खाताना खूपच आनंद होतो.

दाक्षिणात्य पद्धतीचा सार भात किंवा बिशिबिली भात खाताना प्रसाद समजून खाल्ला तर साक्षात भगवंत भेटल्याचा आनंद होतो. आदल्या दिवशीचा भात दुसऱ्या दिवशी कांदा आणि शेंगदाणे घालून परतला की एक परिपूर्ण नाष्टा तयार होतो

चुलीवरचा भात, गॅसवरचा भात असेही प्रकार आहेत. चुलीवरच्या भाताची खरपुडी खाणे (ते ही चुलीशेजारी बसून) खूपच सुखावह आहे. 

मटार भात, वांगी भात,  पावटे भात अशा कितीतरी पाककृती आहेत पण प्रत्येक वेळी नव्या स्वरूपात. माझी भावजय ( सौ अर्चना) हिने पावटेभात कसाही केला तरी चांगलाच होतो. मी खुन्नस देण्याचा प्रयन्त केला आणि सोडूनही दिला. एखाद्याचा हातचा गुण दुसरं काय.

कुकरातला भात आणि पातेल्यातला भात यांच्यात भांडण लावून देऊन मजा पाहणाऱ्यातले आम्ही नाही. त्यामुळे आम्ही दोघांनाही न्याय देतो. 

आजकाल आघाडी युतीचे दिवस आहेत. तांदूळ मुगडाळीबरोबर आघाडीचा धर्म निभावतो आणि सुंदर खिचडी साकारते. त्यावर चिरलेली कोथिंबीर, खिसलेले खोबरे सोबत फार काही नाही पण कढी, उडदाचे पापड, लिंबाचे लोणचे... हे असल्यावर अजून काय हवे..  खिचडी अनेक प्रकारे करता येते.. सरसरीत खिचडी  त्यात शिजताना थोडे मेटकूट(पाण्यात विरघळवून) घातले तर स्वाद उत्तम येतो. 

आठवडी बाजार, मॉल मधून मी बरेचवेळा वेगवेगळ्या  प्रकारचे तांदूळ आणतो. पुर्वीप्रमाणे हातसडीचा तांदूळ हल्ली मिळत नाही. माझ्या या भातप्रेमामुळे बरेच वेळा बायकोला मात्र  खूप ताप होतो. कारण सगळे निस्तरावे तर तिलाच लागते.

खाणारा म्हणतो...

लाजबाब क्या भात है...

अरे भाई उसके पिछे

करनेवाले का हाथ है...


श्री. गुंजन हरी हरी देव

सातारा

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी