मुखी घास घेता करावा विचार


अन्नात् भवती भूतानी... भगवद्गीतेतील तिसऱ्या अध्यायातील हे वचन खरोखरीच विचार करायला भाग पाडणारे आहे. अन्न हे केवळ पोट भरायचे साधन नसून तो शरीरासाठी कार्यशक्ती पुरवणारा एक ऊर्जास्त्रोत आहे.

उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म

काहीही खाताना हा विचार ही जाणीव सतत मनात असायला हवी. परंतु अन्नामुळे ऊर्जा निर्माण होत असली तरी ती ऊर्जा सकारात्मक असावी आणि सकारात्मक कार्यासाठी वापरली जावी यासाठी कोणतीही गोष्ट खाताना मनामध्ये असलेले विचार फार महत्त्वाचे असतात. म्हणूनच जेवताना शांतता असावी, कुटुंबातील सर्वांनी  शक्यतो एकत्र जेवावे असा संकेत आहे. टीव्ही  बघता बघता लोक जेवण करतात. बरेच वेळा आपण काय खातो आणि आपली भूक किती आहे याचीही जाण त्यामुळे राहत नाही. सहाजिकच अपचन ऍसिडिटी असे विकार जडतात.

याला शरीरशास्त्राची सुद्धा जोड आहे कारण शांतपणे सेवन केलेल्या अन्नाचे चर्वण व्यवस्थित होऊन चयापचय व्यवस्थित होते. परिणामी ऊर्जानिर्मिती प्रक्रिया परिणामकारक ठरते.

अर्पण, समर्पण आणि त्याग म्हणजे भारतीय संस्कृती. एकेक छोटी छोटी गोष्ट अर्पण करता करता समर्पणाची सवय जडते. आणि समर्पण वृत्तीमुळे गर्व अहंकार तर दूर जातोच आणि त्यामुळे कर्माची बाधा होत नाही. म्हणून नैवेद्य दाखवून मग आपण जेवावे. आपण जे काही खातो ते ईश्वराला चालते. मी शिळी भाकरी खात असलो तरी त्याचा सुद्धा नैवेद्य  देवापर्यंत पोहोचतो. नैवेद्य म्हणजेच समर्पणाचा भाव. नैैवेद्य दाखवून झाला की पदार्थाचे ‘प्रसादात’ रूपांतर होते. 


यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत्

यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम्।।9.27।।

........... भगवद्गीता


हे कौन्तेया (अर्थात कुंतीपुत्र अर्जुना), तू जे कर्म करतोस, जे खातोस, जे हवन करतोस, जे दान देतोस आणि जे तप करतोस, ते सर्व मला अर्पण कर. ॥

म्हणुनच समर्थ म्हणतात हरीचिंतने अन्न सेवित जावे... 

प्रसादाचे भोजन हा एक वेगळाच विषय आहे. कारण सज्जनगड, गोंदवले येथील प्रसादाची सर कशालाच नाही.  रामस्मरण, नामस्मरण यामुळे अन्नाला प्रसादाचे स्वरूप प्राप्त होते व अन्नाची गोडी शतपटीने वाढते.

मनुष्य हा सुसंस्कृत आहे. ईतर प्राणिमात्रांच्या ठिकाणी ही जाणीव नाही. आपली आई, बहीण, बायको यांनी किंवा आपण स्वतः कष्ट घेऊन तयार केलेल्या अन्नाचे सेवन आनंदाने करावे. खाताना , जेवताना तृप्तता हवी शक्यतो मतभेदाचे किंवा वादाचे मुद्दे जेवण प्रसंगी नसावे. आजच्या बदलत्या जीवन शैलीत सर्व कुटुंबाने किमान एक वेळा एकत्रित भोजन करावे. आठवड्यातून किंवा महिन्यातून किमान एक वेळेस आपले नातेवाईक, मित्र यांच्यासोबत भोजन करावे. यामुळे एकत्रीकरण होते. संबंध सांधले जातात. 

आपण अन्न खाताना कोठेतरी हे पिकवण्यासाठी शेतकऱ्याने दिवसरात्र परिश्रम घेतलेले आहेत,कोणीतरी दळले आहे आणि मग स्वयंपाकाचे कष्ट घेऊन ते आपल्या ताटापर्यंत पोहोचले आहे. यामुळे अन्नाचे एक शीत सुद्धा वाया घालवू नये.

म्हणूनच समर्थ रामदास स्वामी आपणास बजावतात की, 'आपण यथेच्छ जेवणे। उरले ते अन्न वाटणे। व्यर्थ वाया दवडण। हा धर्म नव्हे।।'

वाया जाणारे एक शीत एका लहान जीवाची भूक भागवू शकते.

दारावर आलेल्या कोणालाही निराश करू नये.. प्रत्येक वेळी काही मागणारी व्यक्ती पाहिली की राग अनावर होऊन लोक हेटाळणी करतात किंवा उपदेशाचे डोस पाजतात. त्यापेक्षा घरात उपलब्ध असेल ते  द्यावे अथवा देऊही नये परंतु इतरांना खजील करणे योग्य नव्हे. परवा एक भंगार गोळा करणारा एक छोटा मुलगा भुकेला होता. घरात उपलब्ध असलेले भोजन एका पत्रावळी मध्ये दिले यात खूप मोठे सुख आहे, आनंद आहे. सुरक्षा काळजी असल्यास बाहेर जेवायला देऊ शकतो. कोणीतरी काहीतरी आपल्याला मागतो आणि ते देण्याची संधी रामराया आपल्याला देतो याहून दुसरा आनंद तो कोणता.

गरिबाला उपदेशाचे डोस पाजणारे केवळ पैशाने श्रीमंत असलेले प्रसंगी पार्ट्या, मेजवान्या यामध्ये पोटात भूक नसलेल्यांसाठी हजारो, लाखो रुपयांचा चुराडा करतात तेंव्हा सारे अलबेल असते. श्रीमंत असावे मौज मजा सुद्धा करावी पण दुसऱ्याची जाणीव असावी इतकेच.

भुकेपाशी गरीब, श्रीमंत हा भेदभाव नाही. बँकेत करोडो रुपये असले तरी दुपारी बारा वाजता भूक लागल्यावर अन्नाशिवाय पर्याय नाही.म्हणूनच गोंदवलेकर महाराजांनी अन्नदानचे महत्त्व सांगितले आहे. घासातला घास इतरांना देणे हा संस्कार आहे त्यासाठी आर्थिक परिस्थिती महत्वाची नाही 

बरेच वेळा माझ्या मनात विचारचक्र सुरु असते आणि मनातल्या मनात परमेश्वराचे मी आभार मानतो कारण त्याने मला या भारतभूमी मध्ये जन्म दिला. अन्न सेवन करताना असलेली सर्वोच्च भूमिका म्हणजे....

  • मुखी घास घेता करावा विचार 
  • कशासाठी हे अन्न मी सेवणार
  • घड़ो माजिया हातूनी राष्ट्र सेवा
  • म्हणोनि मला शक्ति दे रामराया ।।

हे परमेश्वरा या पवित्र भुमिमध्ये निर्माण झालेले हे अन्न सेवन करून माझ्याहातून माझ्या देशाची आणि देशबांधवांची सेवा घडावी यासाठी शक्ती दे. मला ज्ञान, वैराग्य, देशसेवा प्राप्त होवो यासाठी मी अन्न सेवन करत आहे. म्हणून जेवताना अन्नाला नमस्कार करून जाणीवपूर्वक अन्न सेवन करावे 


अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राण वल्लभे

ज्ञान वैराग्य सिद्धयर्थम् भिक्षां देही च पार्वती।।

यासाठीच घराघरात नित्यपुजे मध्ये अन्नपूर्णा आहे. घरातील स्त्री साक्षात अन्नपूर्णेचे स्वरूप आहे. ती प्रसन्न असेल तर घर प्रसन्न रहाते .

एकमेकांच्या उरावर बसून परस्परांच्या जिवावर उठणाऱ्या, दहशत पसरवणारे विचार कुठे आणि माझे भारतीय विचार कुठे ? याची तुलना होऊच शकत नाही. 

साने गुरुजींची ही रचना रोज अन्नाचा घास घेताना नक्की म्हणुया

वदनी कवळ घेता नाम घ्या  मातृभूचे

सहज स्मरण होते आपल्या बांधवांचे 

कृषीवल कृषीकर्मी राबती दिनरात 

श्रमिक श्रम करोनी वस्तू या निर्मितात

स्मरण करून त्यांचे अन्न सेवा खुशाल 

उदरभरण आहे चित्त होण्या विशाल

त्यामुळे आपण कोणाच्या बापाचे खात नाही तर माझा आराध्य परमेश्वर मला पोसतो ही भावना सदैव जपुया

आम्ही काय कुणाचे खातो

गुण रघुरायाचे गातो

त्रिभुवन पालक स्वामी

तो राम आम्हाला देतो...


जय हिंद

भारत माता की जय 


श्री. गुंजन हरी देव.

सातारा

Comments

  1. अप्रतीम, अत्यंत सुंदर आणि प्रतेकाने आचरणात आणावी , असे विचार.
    प्रविण देशपांडे

    ReplyDelete
  2. फारच सुंदर विचार...

    ReplyDelete
  3. Sundar apratim lekh aacharanat aanayalach pahije.

    ReplyDelete
  4. अत्यंत महत्वाचे. कुटुंब मुल्य वाढवीणारा संस्कार. कुटुंब प्रबोधन ,२५ संस्कारवर्गां पर्यंत हे पाफवत आहे.

    ReplyDelete
  5. Very nice creation sir👍🙏Best wishes for your further work💐

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी