अती तिथे माती ...
अती तेथे माती
एक भिकारी देवाची भरपूर प्रार्थना करायचा. देवाला त्याची दया आली. एक दिवस देव प्रगट झाला आणि त्याने भिका-याला ‘काय हवे ते माग’, असे सांगितले. भिका-याने सोन्याच्या मोहरा मागितल्या. देव म्हणाला, ‘‘मोहरा कशात घेणार ?’’ भिका-याने झोळी पुढे केली. मोहरा ओतण्यापूर्वी देव म्हणाला, ‘‘तू ‘पुरे’म्हणेपर्यंत मी मोहरा ओतत राहीन; पण एक अट – मोहरा झोळीतून भूमीवर पडता कामा नयेत. भूमीवर पडलेल्या मोहरेची माती होईल.’’
भिका-याने अट मान्य केली. देव भिका-याच्या झोळीत मोहरा ओतू लागला. हळूहळू झोळी भरत आली. भिका-याला सोन्याचा मोह आवरेनासा झाला. मोह-यांच्या भाराने आता झोळी फाटू शकते, हे लक्षात येऊनही भिकारी ‘पुरे’ म्हणेना. शेवटी व्हायचे तेच झाले.
झोळी फाटली आणि सर्व मोहरा मातीमोल झाल्या !समाधानी वृत्ती नसलेला भिकारी दुर्दैवी ठरला.
नको रे मना द्रव्य ते पूढिलांचे
अति स्वार्थ बुद्धी नुरे पाप साचे
घडे भोगणे पाप ते कर्म खोटे
न होता मनासारिखे दु:ख मोठे
विपरीत परिस्थितीला तोंड देत मनुष्य झगडत यश मिळवतो. पण एकदा का लय पकडली की त्या लयीमध्ये तो स्वतःचे स्वत्व सुद्धा हरवून बसतो. ज्याला कोठे थांबायचे हे कळते तो यशस्वी होतो.
स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी पुरेसा वेळ द्यायला हवा. आपले शेजारी, नातेवाईक,मित्र तसेच आपले देशबांधव हे देखील आपल्या आयुष्याचा घटक आहेत. त्यांनाही जाणीवपूर्वक वेळ द्यायला हवा
परमेश्वराने निर्माण केलेला निसर्ग डोळेभरून पाहण्यासाठी हे जीवन आहे. हिरवेगार डोंगर, खळाळणाऱ्या नद्या,आनंदाने किलबिलणारे पक्षी या सगळ्यात मिसळून जायला हवे.
खोल आकाशाकडे टक लावून बघता बघता स्वतःच्या अंतरंगात डोकवायला हवे. दिवसातून किमान एकदा तरी स्वतःशी हितगुज व्हायला हवे. माझ्या एका कवितेची सुरुवात..
सकाळी सकाळी पहावे दर्पण
आपणासी आपण अर्पण व्हावे
स्वार्थ आणि मोह असेपर्यंत मनुष्य स्वतःचाच असत नाही तो इतरांचा कसा होणार?
क्रोधामुळे मोह, मोहामुळे भ्रम, आणि नंतर सद्सद्विवेक बुद्धीचा नाश होतो. त्यानंतर सर्वनाश अटळ असतो.
माणसाच्या मनातील राग, द्वेषातून हिंसा घडते. स्वार्थ, लोभामुळे मन अस्थिर होते. या अस्थिरतेतूनच मन भरकटते.
मनुष्याला कितीही मिळाले तरी त्याचे समाधान होत नाही. अजून मिळावे असेच त्यास वाटत राहते. लोभामुळेच भ्रमर कमळात अडकून पडतो. आपल्याकडे जे आहे त्याचा भोग तो घेऊ शकत नाही. म्हणूनच म्हणतात
भारवाही मेले वाहता ओझे
कस्तुरी मृगाच्या पोटात कस्तुरी असूनही ते इतरत्र शोधत फिरते तसेच मनुष्य आपल्याकडे काय आहे हे न समजल्यामुळे इतरत्र शोधत फिरतो.
या ओळी लक्षात ठेवून पुढे जात राहू. सुख हे क्षणभंगुर आहे तर आनंद हा चिरंतन आहे. त्यामुळे जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाचा बनवू.
धन, संपत्ती, सत्ता यात गैर नक्कीच नाही पण त्यासाठी जिवाभावाची माणसं दुरावता कामा नयेत याची काळजी घ्यायला हवी.
भारत माता की जय..
सुंदर, खुप छान
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद
ReplyDeleteKhup sundar
ReplyDeleteधन्यवाद
Deleteखुपच छान विवेचन
ReplyDeleteखूप खूप धन्यवाद सर
Deleteउत्तम
ReplyDeleteClassic message!
ReplyDeleteThanks sir
Deleteअप्रतिम !👌👌👍👍
ReplyDelete