शिक्षण.

दिनांक ५ सप्टेंबर 

शिक्षकदिनानिमित्त.....

( कृपया संपूर्ण लेख वाचा )

महाराष्ट्र ही संतांची भूमी समाजसुधारकांची भूमी. समाजात सुधारणा घडवायची असेल तर शिक्षणाला पर्याय नाही यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, आगरकर, महात्मा फुले, महर्षी कर्वे ,कर्मवीर भाऊराव पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

केवळ पोट भरायची विद्या म्हणजे शिक्षण नव्हे .

नुसते जगायलाच  नव्हे, तर माणसासारखे जगायला शिकवते ते शिक्षण अशी अशी शिक्षणाची साधी व्याख्या करता येईल.


ज्यायोगे व्यक्ती  मधील जाणिवांची जागृती होईल ते शिक्षण. मी ज्या समाजात राहतो त्याने ,माझ्या देशाने मला भरभरून दिले आहे त्यासाठी कृतज्ञतेची जाणीव निर्माण करते ते  शिक्षण. जाणिवा म्हणजेच इतरांना समजून घेण्याची क्षमता. माझे पालक असतील ,माझे समाजबांधव असतील त्यांच्याशी समरस होण्याची, आपल्या आनंदात त्यांना सामील करून घेण्याची आणि त्यांच्या दुःखात सामील होण्याची जाणीव म्हणजे शिक्षण. समानता, बंधुता या पुस्तकातून व भाषणातून परिपूर्ण होत नाही त्यासाठी त्या आचरणात आणायला हव्यात हे शिकविते ते शिक्षण.


शिक्षक एक वृत्ती आहे, शिक्षक एक धर्म आहे, शिक्षक एक भूमिका आहे. जे कार्य खरा सूर्य करू शकत नाही ते कार्य ज्ञानसूर्य करतो. 

काम करताना मी माझ्या शिक्षकांकडून, शिक्षक सहाकार्यांकडून अनेक  गोष्टी शिकलो. शिक्षक विद्यार्थी एक अतूट नाते आहे. त्यामुळे या ठिकाणची ऊर्जा, चैतन्य नवनवीन प्रेरणा देत राहते. राष्ट्र निर्मिती साठी शिक्षकाची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक समाजासाठी आदर्श आहेत. चांगल्या गोष्टींचा स्वीकार आणि अन्याय , खोटेपणा अनिष्ट गोष्टी यांना विरोध करण्याचा केवळ उपदेश नको. शिक्षकांनी प्रसंगी झळा सोसून सुद्धा आपली भूमिका विषद करण्यासाठी पाय रोवून उभे राहायला हवे. यामध्ये काही वेळा चांगले तर काही वेळा वाईट अनुभव येतातच. अशा वेळी राष्ट्र घडविण्याच्या उद्दिष्टांसाठी प्रयत्नशील रहाताना खडतर व काट्याकुट्याच्या मार्गावरून सुद्धा आनंदने चालत राहू. 


जाणिवेचं ज्ञानात रूपांतर म्हणजे शिक्षण. नवीन शिक्षण पद्धती नुसार फाइव्ह सेन्सेस म्हणजेच बघणे,ऐकणे,रस,स्पर्श गंध या पाच जाणिवा मनुष्याच्या ज्ञानप्राप्तीसाठी कारणीभूत ठरतात. उदाहरणार्थ कुठल्यातरी वासामुळे कुठेतरी वायर जळाली ईलेक्ट्रिकल इंजिनीयरला कळत .याचे  उत्कृष्ट उदाहरण डॉक्टर विश्वेश्वरय्या देता येईल .  रेल्वेतून प्रवास करताना रेल्वेचा आवाज थोडा बदललेला जाणवला आणि त्यांनी ताबडतोब रेल्वे थांबवली चालकाला आश्चर्य वाटले पुढे काही अंतरावरच रेल्वे रूळ तुटला होता.


"मी आणि माझं" यातून बाहेर काढून आपलं कुटुंब व समाज याकडे बघायला शिकवत ते शिक्षण. मित्रानो ज्या झाडाला जास्त फळ असतात ते झाड जास्त वाकते म्हणजेच जास्त नम्र होते तसेच मनुष्य जसा जास्त विद्यावान होतो तसा जास्त नम्र व संयमी होत राहतो. 


परंतु या कलियुगात काही जण शिक्षकाच्या या सहनशक्तीचा अंत पाहतात. अशावेळी मात्र तो रुद्ररूप धारण करतो. अशा शक्तींशी लढा देताना तो हाल-अपेष्टा सहन करतो परंतु लाचारी व हुजरेगिरी मात्र मान्य करत नाही.


ज्या शिक्षणामुळे विवेक जागृत होतो ते शिक्षण. विवेक म्हणजे चांगले आणि वाईट याच्यातील फरक करण्याची क्षमता. खरं तर ही क्षमता लहानपणापासूनच निर्माण होते पण महाविद्यालयीन जीवनात चांगल्या-वाईटाचं परिमाण ठरतं आणि मग या गोष्टी आयुष्यभर आपल्याबरोबर राहतात. माझ्यासाठी काय चांगल आहे, माझ्या कुटुंबासाठी काय चांगल आहे, माझ्या समाजासाठी माझ्या देशासाठी काय चांगल आहे हे हळूहळू मला कळायला हव. 


विचार आणि आचार यात साधर्म्य  साधत ते शिक्षण.  Coordination between theory and practical is essential in Education. केवळ जाड ग्रंथांचे वाचन करून आणि मोठ मोठ्या पदव्या घेऊन शिक्षण परिपूर्ण होत नाही. त्याला व्यावहारिकतेची जोड हवी.


विद्या उदंड शिकला 

प्रसंगमान चुकतची गेला

अहो तया अभाग्याला

कोण पुसे !!


.........ग्रंथराज दासबोध


भूगोल तज्ञांच्या परिषदेत एक नकाशा अनेक तुकडे करून दिला आणि दहा मिनिटात जोडायच्या होता अनेकांनी ते अवघड असल्याचे सांगितले .एका खेडूताने  मी जोडू का म्हणून विचारले. सगळेजण हसले ,पण त्यांने खरंच तो पाच मिनिटात जोडला. मित्रहो त्या नकाशाच्या मागे एक माणूस होता त्यांनी तो नकाशा उलटा केला आणि माणूस जोडत गेला मग नकाशा आपोआप जोडला गेला. " माणूस जोडला गेला की देश जोडला जातो", हे शिकविणारे  खरे शिक्षण.

साधेपणा हे शिक्षणाचं लक्षण. त्यामुळे इतरांचा, त्यांच्या गुणांचा, त्यांच्या ज्ञानाचा आदर करायला शिकवते ते शिक्षण. "याला काय कळते ,त्याला काय कळते", असे कानावर पडले की समजायचं मडकं कच्च आहे.एखाद्या क्षेत्रातील विशिष्ट विषयाची परिपूर्ण ज्ञान म्हणजे शिक्षण. Strive for the perfection. परिपूर्णतेसाठी ज्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अशी अनेक उदाहरणे सचिन तेंडुलकर,लता मंगेशकर देता येतील. ही परिपूर्णता मिळवण्यासाठी सर्वांनाच अखंड साधनेची गरज असते. मला सगळं पूर्णपणे कळतं असा भाव  म्हणजेच अपूर्णता व अज्ञान.

ज्ञानाबरोबरच कौशल्य विकसित करत ते शिक्षण महत्त्वाचे. म्हणूनच शासन सुद्धा कौशल्य विकासावर भर देत आहे.आपल्यातल्या कमतरता उणिवा हेरून त्याचे ताकतीत रूपांतर करणे ही किमया साध्य होते शिक्षणामुळेच. We should be able to convert our weaknesses into our strengths.  आवाज योग्य नसल्यामुळे एका उमेदवाराची आकाशवाणीच्या निवेदक पदासाठी नेमणूक झाली नाही. त्याच आवाजाच्या जोरावर त्याने रसिकांच्या मनावर राज्य केले. ही कथा आहे महानायक अमिताभ बच्चन यांची.

आत्तापर्यंत पाहिलेले शिक्षणाचे सर्व आयाम केवळ पुस्तकी ज्ञानातून किंवा केवळ वाचनाने आमच्यापर्यंत पोहोचू शकत नाहीत. ते आयाम आमच्यापर्यंत पोहोचवण्याचे काम करणारे आमचे गुरु अर्थातच आमचे शिक्षक  आहेत. शिक्षकांसंबंधी कृतज्ञता व्यक्त करण्याचा आजचा दिवस. 


तुकाराम महाराज म्हणतात 

तुका म्हणे नाव

जनासाठी उदक ठाव

शिक्षक हा कुंभारासारखा असतो मडकं तयार होताना एका हाताने थापट्या मारतो पण दुसरा हात मात्र मदक्याच्या आत  आधार देत असतो . तो आधार देत असतो. हीच खरी शिक्षकाची भूमिका असते.


*आज शिक्षकदिन. आपल्याला घडवणाऱ्या असंख्य शिक्षकांना नम्र प्रणाम.*


*भारताचे दुसरे राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रत्यर्थ त्यांचा जन्मदिन संपूर्ण भारतभर शिक्षक दिन म्हणून साजरा करतात.*


 डॉ. राधाकृष्णन यांनी 1909 ते 1948 वर्षं पर्यंत म्हणजे 40 वर्षे शै‍क्षणिक क्षेत्रात शिक्षकाचा कार्यभार सांभाळला . 

त्यांचा जन्म 5 सप्टेंबर 1888 साली आंध्र राज्यातील चितुर जिल्ह्यातील तिरूपाणी या गावी झाला. प्राथमिक शिक्षण  गावी.झाले तर पुढील शिक्षण तिरुपती या गावी झाले. त्यांचे शिक्षण लुथरम मिशन हायस्कूल मध्ये झाले. नंतर तत्त्वज्ञान विषय घेऊन ते प्रथम क्रमांकाने पास झाले त्यांनी एम्.ए. साठी नितीशास्त्र विषय घेतला. 


प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये (मद्रास) तर्कशास्त्राचे प्राध्यापक म्हणून 1917 पर्यंत कार्य केले. 1939 मध्ये आंध्र विद्यालयाने त्यांना डी. लिट. ही पदवी दिली. 


1931 साली इंग्रजांनी डॉ. राधाकृष्णन यांना सर ही मानाची पदवी बहाल केली. त्यांच्या वाढत्या गुणांमुळे, प्रगतीमुळे 1946ते 1949 या काळात भारतीय राज्य घटना समितीचे सभापती म्हणून निवड झाली. 

1952 मध्ये भारतात पहिली निवडणूक होऊन उपराष्ट्रपती म्हणून त्यांची निवड झाली. त्याच वेळी ते दिल्ली विद्यापीठाचे कुलपती होते. तसेच 1939 ते 48 बनारस हिंदू विश्वविद्यालयाचे कुलपती होते. 


1957 च्या दुसर्‍या सार्वत्रिक निवडणुकीत ते पुन्हा उपराष्ट्रपती झाले. उत्कृष्ट कार्य कर्तृत्त्वामुळे त्यांना 1958 साली भारतरत्न हा पुरस्कार देण्यात आला. 


स्वतंत्र भारताला शिक्षण विषयक आपले धोरण निश्चित करणे आवश्यक होते. यासाठी १९४८ ला भारत सरकारने पहिला शिक्षण-आयोग स्थापन केला. त्याच्या अध्यक्षपदी डॉ. राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली. त्यांनी लेखनही भरपूर केले होते. त्यांचे तत्वज्ञान विषयक ग्रंथ जगभर गाजले . भारतीत धर्माचे श्रेष्ठत्व दाखवून देणारे त्यांचे ग्रंथ आहेत. प्राध्यापक असल्यापासून त्यांनी शिक्षकाच्या भूमिकेत कोणकोणते गुण असणे आवश्यक आहे ते स्व:त च्या उदाहरणाने दाखवून दिले. 


आदर्श शिक्षकाने व्यासंगी बनावे, चांगल्या पद्धतीने आपले विचार दुसर्याला सांगावे, शैक्षणिक क्षेत्रातील गुण-दोष पाहून त्यावर कशी मात करता येईल त्यावर लक्ष ठेवावे म्हणजेच आदर्श शिक्षक होता येईल हाच त्यांनी आदर्श शिक्षक बनण्यासाठी दिलेला संदेश होता.

डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी आजन्म शिक्षण क्षेत्रात आणि शिक्षण विषयांत लक्ष घालून दिलेले विचारधन लक्षात घेऊनच त्यांचा जन्मदिन हा’शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो.  त्यांच्या मते खरा गुरु तोच जो केवळ बौद्धिक नव्हे तर अध्यात्मिक अंध:कारही नाहीसा करील. ज्याचा आचार आदर्शवत व अनुकरणीय आहे तोच आचार्य ! 

शिक्षक आणि शिष्य यांच्यात काही नाते निर्माण झालेले नसेल तर शिक्षण हि एक यांत्रिक क्रिया बनते. डॉ.राधा कृष्णन हे हाडांचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. डॉ. राधा कृष्णन यांचे १६ एप्रिल १९७५ रोजी निधन झाले.

डॉ.राधा कृष्णन हे हाडाचे शिक्षक होते. आदर्श शिक्षकाची सर्व लक्षणे त्यांच्यात होती. शिक्षण क्षेत्रातील प्रगतीसाठी डॉ. राधाकृष्णन यांच्या जीवन कार्यापासून आपण प्रेरणा घेऊ यां !

त्यामुळे एकमेकांना मानसिक आधार देण्यासाठी,उंच भरारी घेण्यासाठी पंखात बळ भरण्यासाठी, श्रद्धा व विश्वास यांच्याद्वारे मनामनामध्ये आत्मविश्वास जागवण्यासाठी शिक्षकाची भूमिका अतिशय महत्वाची आहे.


@श्री. गुंजन हरी देव

  9890590495




Comments

Post a Comment

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी