आपले भविष्य...आपली युवाशक्ती
माणसाने आयुष्यामध्ये जगावं कसं, व्यवहार कसा असावा, अत्यंत बिकट परिस्थितीत संकटांचा सामना करत यश कसे मिळवावे, लोकसंग्रह कसा करावा, सर्व सत्ता असूनही संन्यस्त व निस्वार्थी वृत्तीने कसे जगावे या सर्व प्रश्नांचे एकच अचूक उत्तर आहे. ती म्हणजे शिवचरित्राचा अभ्यास.
पूर्वी घरगुती उपचार म्हणजेच आजिबाईंचा बटवा असायचा. त्याप्रमाणे प्रत्येक समस्येवर उपाय देणारे रामायण, महाभारत, भगवद्गीता, शिवचरित्र घरोघरी असायलाच हवेत.
रामायण आणि महाभारत यातील सर्वच प्रसंग हे प्रेरणादायी आहेत. लहानपणी छत्रपतींना मातोश्री जिजाऊंनी राम, कृष्णाच्या कथा ऐकवल्या. प्रत्यक्ष परिस्थितीशी झुंजत व परिस्थितीवर मात करत छत्रपती शिवराय घडले. छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आम्ही आमच्या कपाळाला मोठ्या अभिमानाने लावतो. या पावन भूमीत जन्मलेल्या प्रत्येकालाच छत्रपतींचा वारसा आणि आशीर्वाद जन्मतः प्राप्त आहेत.
हे सर्व आम्ही जाणतो. शिवरायांना कोटी कोटी वंदन करतो. पण पुढे काय ? शिवचरित्रातील प्रत्येक प्रसंग आम्हाला जगण्याचे बळ देतो, परिस्थितीशी लढायला शिकवतो यातून खरंच आणि काही बोध घेतो का ? अमृत समोर असताना आम्ही तान्हेने व्याकुळ होत असू तर अमृताचा दोष नव्हे.
शिवरायांचे आठवावे रूप ।
शिवरायांचा आठवावा प्रताप ।
शिवरायांचा आठवावा साक्षेप ।
भूमंडळी ।।१।।
शिवरायांचे कैसें बोलणें ।
शिवरायांचे कैसें चालणें ।
शिवरायांची सलगी देणे ।
कैसी असे ।।२।।
सकल सुखांचा केला त्याग ।
म्हणोनि साधिजें तो योग ।
राज्यसाधनाची लगबग ।
कैसीं केली ।।३।।
याहुनी करावें विशेष ।
तरीच म्हणवावें पुरुष ।
या उपरीं आता विशेष ।
काय लिहावे ।।४।।
शिवरायांसी आठवावें ।
जीवित तृणवत् मानावें ।
इहलोकी परलोकीं उरावे ।
कीर्तीरूपें ।।५।।
निश्चयाचा महामेरू ।
बहुत जनांसी आधारू ।
अखंड स्थितीचा निर्धारु ।
श्रीमंत योगी ।।६।।
– समर्थ रामदासस्वामी
शिवरायांचा गनिमी कावा म्हणजे छत्रपती शिवरायांनी युद्धशास्त्राची जगाला दिलेली एक देणगीच आहे . अनेक वेळा शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असते. विशेष करून आपल्याकडे मर्यादित संसाधने असतील व शत्रू प्रबळ असेल तर अशावेळी युद्ध हे यूक्तीनेच जिंकावे लागते. हे जर कळले नाही, समजून घेतले नाही तर वेडात मराठे वीर दौडले सात... अशी बिकट अवस्था निर्माण होऊ शकते.
मर्यादित संसाधनांमध्ये, विपरीत परिस्थितीत शिक्षण घेऊन उत्तुंग ध्येयाने प्रेरित झालेले तरुण हीच राष्ट्राची खरी संपत्ती आहे. राष्ट्र भावनेने प्रेरित झालेले हे देशाचे शक्तिकेंद्र आहेत. शक्ती आणि संयम असतील तरच अपेक्षित यश मिळेल. शक्ती प्राप्त करण्यासाठी अपार साधना लागते.
परंतु शक्ती बरोबर अहंकार उत्पन्न होण्याची शक्यता जास्त असते. शक्तीचा उपयोग विधायक कामासाठी होताना त्यात अहंकार आडवा येतो. त्यामुळे शक्तीला संयमाची जोड असणे अत्यंत गरजेचे आहे. शिव आणि शक्ती एकत्र असेल तरच यशप्राप्ती होते.
शिव सत्य स्वरूप आहे या सत्याची शक्तीला जोड मिळते आणि मग शक्ती विधायक कार्याकडे वळते. तसेच संयमाला शक्तीचा पाठिंबा नसेल तर असे सत्य हे दुबळे सत्य असते. सामर्थ्य नसेल तर असे सत्य झाकोळले जाणार त्यामुळे शक्ती आणि संयम दोन्हीही जोपासणे अत्यंत गरजेचे आहे.
माऊली ज्ञानेश्वरीत म्हणतात
चंद्र तेथे चंद्रिका |शंभु तेथे अंबिका|
संत तेथे विवेका | असणेकीजी ||
विवेक हे ज्ञानाचे मुख्य लक्षण आहे.
केवळ पैशाच्या व सत्तेच्या जोरावर जगावर राज्य करता येत नाही. जुलूम जबरदस्ती चे राज्य फार काळ टिकत नाही हा ईतिहास आहे. त्यामुळेच चारशे वर्षानंतर प्रेरणा देणारे शिवचरित्र जगाला प्रेरणादायी आहे.
शौर्य, पराक्रम, यश या सर्वांना मर्यादेचे व संयमाचे कोंदण असेल तर शक्ती विधायक मार्गाकडे जाते. म्हणूनच मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांचे चरित्र सदैव ध्यानात ठेवायला हवे.
अनेक संकटांना तोंड देत, प्रसंगी स्वकियांचा विरोध स्वीकारत, सर्व प्रकारची आव्हाने स्वीकारत व त्यावर मात करत शिवरायांनी स्वराज्य स्थापना केली. मित्रहो आत्ताची घडी देखील प्रचंड बिकट आहे. एकीकडे कोरोना रुपी राक्षसाशी आपण सर्व देशबांधव लढत आहोत. एकीकडे आपल्या संयमाचे व दुर्दम्य इच्छाशक्तीचे जगातून कौतुक होत आहे तर दुसरीकडे आपल्यातीलच काही राक्षसी अपप्रवृत्ती त्रासदायक ठरत आहेत. अशा बिकट परिस्थितीत पूर्ण ताकदीनिशी लढता लढता संयम ठेवणे ही देखील एक काळाची गरज आहे.
कोरोना राक्षस केवळ आरोग्या वरच हल्ला करत नसून, अनेक देशांची अर्थव्यवस्था, समाज व्यवस्था, उद्योग जगत , रोजगार या सर्वांवरच थोड्या अधिक फरकाने परिणाम करणार आहे. त्यामुळे आमच्या जीवनशैलीत आमूलाग्र बदल घडून येणार आहे. आणि त्यासाठी स्वतःला सज्ज करणे ही देखील एक सर्वांची जबाबदारी असणार आहे.
आपली उत्पन्नाची साधने कमी होऊ शकतात, त्यामुळे अनावश्यक गरजा आत्तापासूनच कमी केल्या पाहिजेत. उपलब्ध असणाऱ्या साधनसामग्रीचे अतिशय काटेकोरपणे व्यवस्थापन करायला हवे. मला काय मिळेल यापेक्षा, याही परिस्थितीत मी इतरांना म्हणजेच देशाला, समाजाला आणि विश्वाला काय देऊ शकतो याचा विचार मनात असायला हवा.
आपली होणारी हानी भरून काढता काढता, इतर कोणालातरी मदतीचा हात देण्याचे दिव्य आपल्या सर्वांनाच पार पाडावे लागणार आहे. आपल्या सर्व नागरिकांना अशा ही गंभीर परिस्थिती सुद्धा आधार देत सुरक्षितपणे मायदेशी परत आणणारा भारत, जगाच्या अवघड घडीच्या वेळेस स्वतः संकटाचा सामना करत असताना इतरांच्या मदतीला धावून जाणारा भारत देश आपली मायभूमी आहे. याच गौरवशाली परंपरेचा पण जन्माला आलो याचा आपल्याला सार्थ अभिमान आहे. जगा आणि जगू द्या हे तत्वज्ञान देणारी भारतीय संस्कृती केवळ आपल्यालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला आदर्श आहे. पदोपदी शिवरायांचे स्मरण करत, ध्येयाच्या दिशेने एकेक पाऊल पुढे टाकूया आणि संपूर्ण विश्वाला आपल्या भारतीयांची ताकत दाखवून देऊया.
जय हिंद ||
भारत माता की जय ||
श्री गुंजन हरी देव
सातारा.


अप्रतिम 🙏
ReplyDelete