शिक्षणाची नवी क्षितिजे उलगडताना........
नवी क्षितिजे उलगडताना........
आमच्या लहानपणीचे दिवसच निराळे होते. आयुष्याला केवळ दोनच पैलू होते. एक म्हणजे घर आणि दुसरे म्हणजे शाळा. त्याकाळात शिक्षणाचे बाजारीकरण झाले नव्हते. कदाचित आजच्यासारखे प्रोफेशनल ,कॉम्पिटिटिव्ह ऍप्रोच त्या शिक्षण व्यवस्थेकडे फिरकले नसावेत. शिक्षक म्हणून बरेच वर्षे काम केल्यानंतर आजची शिक्षकाच्या नजरेतून अनुभवलेली व्यवस्था आणि त्या काळी एका साध्याभोळ्या विद्यार्थ्यांच्या नजरेतून पाहिलेली व्यवस्था या प्रचंड तफावत तर नक्कीच जाणवत आहे.
माणसं तर सगळी तीच आहेत. अंतरंगातले शिक्षक तसेच आहेत विद्यार्थी, संस्था, इमारती यांचे मूळ स्वरूप सुद्धा तंतोतंत असेच आहे. काहीच बदललेले नाही. परंतु दुर्दैव आहे की मूळ रूपावर एवढी बाह्यावरण आहेत की मूळ रूप कुठेतरी झाकलं गेलं आहे. आत्मा आहे पण दिसत नाही त्याची जाणीव मात्र निश्चित होते अशीच काही अवस्था आहे. अवस्थेला जबाबदार आहे ती व्यवस्था. दोन्ही काळातील व्यवस्था आणि व्यवस्थापन पद्धती यात प्रचंड बदल झालेला आहे.
शिक्षकांनी शिक्षा करण्याची छडी मारण्याची मुभा पालकांनीच दिलेली असायची. शिक्षक संपूर्ण वर्गात नावानिशी ओळखत असायचे एवढेच नव्हे तर शिक्षकांचा विद्यार्थ्यांच्या आई-वडिलांशी देखील संपर्क असायचा. त्या काळात शिक्षण इंग्रजाळलेलं नव्हतं. भाषा इंग्रजी होती परंतु संस्कार मात्र मराठीच होते. बाईंच्या मॅडम झाल्या नव्हत्या शाळेच्या वेळेत प्रसंगी बाईच आम्हा सगळ्या विद्यार्थ्यांची आई व्हायच्या.
सत्य वस्तुस्थितीला धरूनच असायचं. साहजिकच सत्य सगळ्यांच्या आसपास वावरायचं. त्यामुळे सत्याचे धडे वेगळे शिकवण्याची आणि शिकण्याची गरज फारशी भासत नसे. असलेले चेहरे आणि दाखवण्याचे चेहरे एकसारखे असायचे.
साधा पण स्वच्छ गणवेश, एखादी शिवून घेतलेली पिशवी म्हणजेच दप्तर... अतिशय साधी राहणी होती. अगदी बालवाडीपासूनच आजकाल सुरू असलेले सुटाबुटाचे संस्कार आमच्यावर कधी झालेच नाहीत. आजकाल काहीवेळा बाहेरचे सुटबुट आतून लोंबणारी आणि बाहेर डोकावणारी असंस्कृतपणाची लक्तरे झाकू शकत नाहीत. त्याकाळी ठिगळ लावलेले सदरे, ठीगळाची चड्डी याची लाज वाटत नसे. त्याकाळीही श्रीमंत लोक होते, गरीब लोकही होते पण श्रीमंत आणि गरीब दोन्ही एकाच शाळेत शिकायचे. श्रीमंतीचं आणि गरीबीचे प्रदर्शन करण्याच्या पद्धती मात्र लोकांना फारशा आत्मसात नव्हत्या. आजकाल सहकार्य ही कर्तव्यबुद्धी आहे, त्या काळी तो सहजभाव होता. एकमेकांना मदत करायची असते एवढेच माहीत असायचे. ती करतानाचा एखादा फोटो, एखादी बातमी, जाहिरातीचा फ्लेक्स, शुभेच्छा/अभिनंदन संदेश यांचे फलक झळकविण्याची फारशी प्रथा नव्हती.
असो या सगळ्याच आठवणी आहेत. परंतु असे शिक्षण अनुभवल्यामुळे आमच्या पिढीतील सर्वजणच पालक, शिक्षक या नात्याने काही गोष्टींची अपेक्षा सध्याच्या शिक्षण व्यवस्थेकडून करतात. केवळ सामाजिक आणि भौगोलिक जाणीवच नव्हे तर सर्व प्रकारच्या जाणिवांचं जतन करणारी केंद्रे म्हणजे शाळा आणि महाविद्यालये. परंपरा आणि पद्धती काळानुरूप बदलायच्या आणि तसा सकारात्मक बदल स्वीकारायला देखील हवा. परंतु जाणीव मात्र जिवंत राहिली पाहिजे. यासाठी सत्य आणि वास्तव यांची एक वृत्ती असायला हवी.
इंग्रज युरोपातून आले आणि त्यांनी त्यांची शिक्षण पद्धती आमच्या वर लादली. सत्तेपुढे शहाणपण चालत नसतं हे खरं आहे. त्या शिक्षण पद्धतीत सारंच चुकीचं होतं असा ग्रह करून घेणे देखील हितावह नाही. परंतु इंग्रज आपल्या देशातून गेल्यानंतर शिक्षणव्यवस्थेत योग्य ते बदल करायला आम्ही फार उशीर केला हे मान्य करावं लागेल. आंतरराष्ट्रीय भाषा शिकाव्या लागतील, काही प्रमाणात इतरांची संस्कृती देखील जाणून घ्यावीच लागेल. याबाबत कोणतीही शंका असण्याचे कारणच नाही पण आमची संस्कार आणि आमची संस्कृती, आमची अस्मिता यांचे जतन करून या गोष्टी अंगीकारायला हव्यात. संस्कार, संस्कृती देशप्रेम भारताचा सुवर्ण इतिहास अशा अनेक बाबींचा समावेश शिक्षणात करणे इंग्रजांनी हेतुपुरस्सर टाळले.
भारत वर्षाचा सुवर्ण इतिहास आम्हाला आधी समजायला हवा. शिवछत्रपतींचे चरित्र आत्मसात झाले आणि रक्तात भिनले की झाले. व्यक्तिमत्व विकासाचे शिक्षण वेगळे काय असते ? कोवळ्या वयात फासावर गेलेल्या क्रांतिकारकांचे चरित्र आधी आणि नंतर संपूर्ण जगाचा इतिहास शिकायला हवा. प्रभू राम, श्रीकृष्ण समजले की जीवनाचे सार उलगडते. छत्रपतींना घडवणाऱ्या आईसाहेब जिजाऊं, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले यांच्या आदर्शातून आणि छत्रपती शिवराय, वीर सावरकर, स्वामी विवेकानंद, सुभाष बाबू, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतूनच नवी पिढी घडायला हवी. मूल्य शिक्षण हा शिक्षणाचा महत्त्वाचा पैलू आहे. मूल्य ही मूल्य संपत्ती आहे याची जाणीव अशा चरीत्रांमधून नक्कीच होते. जीवन म्हणजे केवळ भोग नसून त्याला त्याग, समर्पण अशा किनारी असतात यातूनच शिकायला मिळते.
वस्तुस्थिती समजून घेणारे शिक्षण महत्त्वाचे आहे. बाहेर मे महिन्यातील रणरणते ऊन असताना, असह्य उन्हाळ्यात टाय आणि कोट हा आमचा गणवेश असू शकत नाही. त्या त्या स्थानिक वातावरणानुसार हवामानाप्रमाणे वेश, गणवेश असायला हवेत. अशा छोट्या-छोट्या विषयांमध्ये अनेक बदल अनेक शिक्षण तज्ञांच्या आणि लोकांच्या सहभागातून शोधून काढता येतील.
एकीकडे स्थानिक अस्मितेची भाषा करायची आणि दुसरीकडे शिक्षण मात्र इंग्रजीतूनच द्यायचे या बाबी परस्पर विरोधी वाटतात. परंतु आंतरराष्ट्रीय भाषा आत्मसात करणे आणि अस्मिता देखील जपणे या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या झाल्या आहेत. मातृभाषेचे स्थान अतिशय महत्त्वाचे आहे. अस्मिताच जपली जात नसेल तर शिक्षणाचा काय उपयोग ? आणि आपल्या अस्मितेचे प्रतिनिधित्व जगासमोर करता येत नसेल तरी ते शिक्षण कुचकामी ठरेल. म्हणूनच याचा सुवर्णमध्य स्वीकारायला हवा.
आजच्या काळातही प्रभावी, सक्षम आणि आदर्श शिक्षक आहेतच. शिक्षकांवरील अतिरिक्त कामकाजाचे ओझे काही प्रमाणात कमी करायला हवे. त्यांना कामकाजाच्या विशिष्ट चौकटीत बंदिस्त करून ठेवता कामा नये. त्यांना काही प्रमाणात मोकळेपणा द्यायला हवा. विज्ञान, व्यवहार, व्यापार, शिकतानाच विद्यार्थी अनेक गोष्टी शिक्षकांकडून शिकतो. विद्यार्थ्यांची मानसिक जडणघडण, व्यक्तिमत्व विकास याची निर्मिती शिक्षकांमुळे होते. परंतु वेगवेगळी नामांकने मिळवण्याच्या जीवघेण्या स्पर्धेत शिक्षकाचा कारकून होणार नाही याची देखील दक्षता घ्यायला हवी. स्वतःचे मूलभूत अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या या संबंधित शिक्षकांनी देखील स्वतः जागरूक असावे. प्रसंगी विरोध पत्करून खडतर मार्ग स्वीकारायची तयारी असायला हवी. साधना, सत्य आणि सातत्य याचे उदाहरण शिक्षक स्वतःच्या आचरणातून घालून दिले पाहिजे.
ज्ञानार्जनाची ही प्रक्रिया मनमोकळ्या संवादामुळे जास्त प्रभावी ठरते. सध्या पालक, शिक्षक, विद्यार्थी, समाज या सगळ्यांसमोरच "संवादाचा अभाव" , हे मोठे आव्हान आहे. कारणं काहीही असोत मोबाईल, समाज माध्यमांचा अतिरेकी वापर, टिव्ही इत्यादीमुळे कुटुंबातील, शाळेतील, कॉलेजमधील, मित्रा मित्रां मधील संवाद कमी होत चालला आहे हे सत्य केवळ मान्य करून उपयोग होणार नाही. या समस्येवर उपाय योजले पाहिजेत. या उपायांची सुरुवात शाळा कॉलेजपासून झाली तर उत्तमच. आठवड्यातून किमान एक दिवस मोबाईल पूर्णपणे बंद, महिन्यातील एक आठवडा दुचाकी पूर्णपणे बंद केवळ सार्वजनिक वाहतुकीचा वापर करायचा, आठवड्यातील एक तास अथवा ठराविक वेळ फक्त मनमोकळेपणाने गप्पा मारण्यासाठी राखीव ठेवायचा असे अनेक विविध परीचे उपाय योजता येतील. कलात्मकता आणि सर्जनशीलता यासाठी विशेष प्रयत्न केले पाहिजेत.
आठवड्यातील ठराविक तास मैदानावर जायलाच हवेत. भविष्यात यातूनच उत्तम खेळाडू घडणार आहेत. विद्यार्थी, शिक्षक,पालक सगळ्यांनीच स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यायला हवी. योग, सूर्यनमस्कार, व्यायाम याचे महत्त्व आपण सर्वांनी नवीन पिढीला समजावून घ्यायला हवे. श्रमाचे महत्व नवीन पिढीला पटवून द्यायला हवे.
या काळात असणारी स्पर्धा, आव्हाने विचारात घेऊन त्यांची मानसिकता समजावून घेताना, त्यांच्यातलाच एक घटक होऊन शिक्षक अनेक गोष्टी सहजतेने साध्य करू शकेल. तंत्रज्ञानातील बदल, उपलब्धता यामुळे बदलत चाललेली जीवनपद्धती विचारात घेतात हे काम सातत्याने आणि निष्ठापूर्वक करावे लागणार आहे. पूर्वीच्या काळातील आणि या काळातील समस्या, आव्हाने, उपलब्धता , स्पर्धा या सर्व बाबींमध्ये फार मोठी तफावत आहे. त्यामुळे नव्या विचारांनी, नव्या पद्धतीने प्रयोगशीलता उपक्रमशीलता याद्वारे शिक्षकांनाच या गोष्टी साध्य कराव्या लागणार आहेत. एका मोठ्या बदलाला सामोरे जाताना राष्ट्राची खरी संपत्ती म्हणजे हे बाल ,युवा घडवण्याचे एक दिव्य सर्व शिक्षकांना पार पाडावे लागत आहे. त्यासाठी कटिबद्ध असलेल्या सर्व गुरुजनांना मानाचा मुजरा.
जय हिंद
भारत माता की जय.
श्री गुंजन हरी देव.
सुंदर छान लेख, 'बदल' ही काळाची गरज आहे..
ReplyDeleteधन्यवाद सर
Deleteलेख अप्रतिम पण आताचे पालक आणि शिक्षक काही अंशी जबाबदार आहेत मुळात शिक्षकांचा शाळेतला पेहराव आणि पालकांचा सुद्धा पेहराव, घरामध्ये आताच्या आणि माज्या generation च्या mothers बघितल्या तर हाताच्या बोटावर मोजण्याइतक्या mothers घरामधून शुभंकरोती मनाचे श्लोक गीता अध्याय यांचे शिक्षण देतात आपण राम कृष्ण शिवाजी महाराज सावरकर लोकमान्य टिळक यांच्या गोष्टी ऐकल्या आणि त्या ऐकत असताना पालक आपल्याला त्यांनी कस आचरण केलं तस आचरण तुम्ही पण करा हे शिकवलं मनावर ठसवल पूर्वी चे शिक्षक मुलांसाठी अहोरात्र झटत शिक्षकी पेशा खूप शुद्ध होता त्यात पैसा हा शब्द ही नव्हता आणि आजच्या सारखे बाजारीकरण पण नव्हते लेख अप्रतिम आहे आणि त्यातून खूप काही शिकण्यासारखं आहे फक्त आताचा हा आधुनिक बदल मनाला रुचत नाही शिक्षण कमी आणि दिखावच जास्त झालाय आता
ReplyDeleteअगदी बरोबर आहे
Deleteविचार करायला लावणारा लेख.
ReplyDeleteवसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडून भारत स्वतःचे आंतरिक सामर्थ्य प्रकट करू शकतो.