शिव,शक्ती आणि समाज
देवाधिदेव महादेव शंकर हा इतर देवांपेक्षा वेगळा आहे. उत्पत्ती, पालन आणि लय यातील शेवटची जबाबदारी महेशाची. महाप्रलयाची देवता असूनही प्रसंगी तारणहार होणारा, शीघ्रकोपी असूनही भक्तांवर लगेचच प्रसन्न होणारा हा देव आहे.
शिव म्हणजेच सत्य, शिव म्हणजे साधेपणा, शिव म्हणजे सहजता. स्वभाव अतिशय भोळा, राहणीमान अत्यंत साधे, आवडीनिवडी म्हणजे सहज उपलब्ध होणारे घटक.एकांत प्रिय असणाऱ्या शंकराचे हिमालय/कैलास हे मूळ स्थान आहे. प्रसंगी स्मशाभूमीत वास करणारा हा देव आहे.
एक महत्त्वाचे वेगळेपण म्हणजे गरज पडल्यावर सर्व देवांना सुद्धा याचा आधार वाटतो. समुद्रमंथनात उत्पन्न झालेले विष आनंदाने प्राशन केलेला हा शंकर आहे. विषामुळे त्याचा कंठ काळानिळा झाला आहे, म्हणूनच तो निळकंठ आहे. यावर सर्वांगाची आग झाली आणि उपाय म्हणून त्यांने स्मशानातील राख भस्म म्हणून अंगाला लावून घेतली. आणि तरीही आग कमी होईना म्हणून राम नामाचा जप केला.
समाजात अमृत पिण्यासाठी सारेच सज्ज असतात. पण समाजासाठी, देशासाठी काही सोसायचे असते तेंव्हा मोजकेच भोळे सांभ विष प्राशन करण्यासाठी अग्रेसर असतात. अशांमुळेच समाज टिकून आहे.
उलटपक्षी काही विघातक शक्ती यांना त्रास देण्यात धन्यता मानत असतात. परंतू अफाट सहन शक्ती असलेले, हे सत्यप्रिय लोक जर क्रोधित झाले तर त्यांचा राग आवरणे खूपच कठीण होईल. जर यांनी तिसरा डोळा उघडला तर प्रलय होईल. त्यामुळे सज्जन व चांगल्या लोकांच्या सहनशक्तीची कधीही परीक्षा बघू नये. सज्जनांना चांगल्या कार्यासाठी साथ द्यावी, ते शक्य नसेल तर किमान गप्प बसावे. शिवाचा कोप ओढवला तर निर्माण होणारा भीषण तांडव प्रचंड मोठी उलथापालथ घडवून आणतो.
शिव आणि शक्ती नेहमी एकत्र असतात. शक्ती नसेल तर सत्याची ताकत जग मान्य करीत नाही. आणि शिवाची म्हणजेच सत्याची साथ नसेल तर शक्ती विधायक मार्गाकडे जात नाही.
शंभू तेथ अंबिका.... ज्ञानेश्वरी
आयुष्य म्हणजे शिव आणि शक्तीचा खेळ आहे. शक्तीचे शिवाच्या ठायी संपूर्ण समर्पण हा आयुष्यातील परमोच्च सोहळा. जोपर्यंत कोणतीही शक्ती अशी समर्पणाची भूमिका स्वीकारून कार्य करते तोपर्यंत विश्वात शांतता आणि आनंद असतो. अन्यथा विनाश अटळ असतो.
ज्याचा विचार जैसा !
तयासी ईश्वर तैसा !!
त्यामुळे विघातक विचारांना , शक्तींना कायमच शिवशंकराला घाबरायला हवे. आणि रचनात्मक, विधायक वाटचाल करणाऱ्यांनी भक्तिपूर्वक कैलास नाथाला शरण जायला हवे . महाशिवरात्रीनिमित्त पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा.
श्री गुंजन हरी देव
सातारा
👌🙏👍
ReplyDelete