रंगपंचमी....आयुष्य रंगीत आहे




निसर्गातील व अंतरातील विविध रंगांचे प्रकटीकरण करणारा, बाह्य रंग बघता बघता "अंतरंगात" डोकवायला लावणारा उत्सव म्हणजे रंगपंचमी. कोणताही रंग चांगला किंवा वाईट नसतो. बघणार्‍यांची नजर व परिस्थिती यावर सर्व अवलंबून असते. 

विविधता ही तर सृष्टीची परंपरा. विविध रंगांनी रंगलेली ही वसुंधरा आणि रंगांची उधळण करीत येणारा वसंत ऋतू मनाला भावून जातात.

आकाशाचा निळा रंग, उगवतीचा केशरी भगवा रंग, गर्द हिरवी वनराई, लालभडक गुलमोहर, मनाला कमालीचा भावणारा नीलमोहर, काळ्याकुट्ट आकाशात पसरणारे पांढरे शुभ्र चांदणे, मावळतीच्या सोनेरी छटा अशी विविध रंगांची मुक्त हस्ताने निसर्ग उधळण करत असतो. 

एक वा अनेक रंगांच्या मिश्रणाने अजूनही वेगळाच रंग तयार होतो. प्रत्येक रंगाला देखील विविध छटा आहेत. डाळिंबी ,तांबट, सोनेरी चंदेरी, अबोली, कोरांटी, शेवाळी, आकाशी, गुलमुक्षी, पारवा , पोपटी असे हजारो विविध प्रकार आहेत. लाल आणि तांबडा हे दोन रंग वेगवेगळे आहेत. 

स्थळ कालपरत्वे रंगानाही विविध अर्थ असतात. रंगांचे मिश्रण योग्य असावे लागते. दोन रंग एकमेकांना पूरक असावे लागतात. या रंगांना एकत्र आणणाऱ्या कुंचल्याचीही कमाल तेवढीच महत्त्वाची असते.कुंचला नसे करात, तरीही तूच रंगनाथ ...असे फक्त त्या नियंत्याच्या बाबतीतच होऊ शकते.

रंगांची व छटांचीही एकमेकांशी स्पर्धा असते. प्रत्येक रंग एकमेकावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न करत दुसऱ्यापेक्षा उठून दिसण्याचा प्रयत्न करतो. बऱ्याच वेळा एखादा छोटासा रंगाचा ठिपका पूर्ण पसरलेल्या पार्श्वभूमीवर स्वतःचे अस्तित्व प्रखरपणे मांडतो. याउलट एखाद्या रंगाच्या अनावश्यक अस्तित्वामुळे संपूर्ण पार्श्वभूमी बदनाम होते.


रंग हे नेहमीच बोलके असतात. रंगांमध्ये भावना लपलेल्या असतात. त्यामुळेच रंग दाखवणे ,रंग बदलणे, रंग उधळणे, रंग उतरणे, रंग फिका पडणे, रंग उडणे, रंगाचा बेरंग होणे असे विविध वाक्प्रचार प्रचलित आहेत. 

कालमानपरत्वे रंगांमध्ये देखील बदल होत जातात. कोणत्याही रंगाला अमरत्वाचे वरदान नाही. दुसरा एखादा रंग त्याला कधी झाकून टाकेल हेही सांगता येत नाही. पण तरीही प्रत्येक रंग स्वतःचे अस्तित्व पूर्णपणे प्रकट करतच राहतो. 









निसर्गा प्रमाणेच माणसांनाही विविध रंग असतात आणि मनुष्याप्रमाणे रंगांनाही संग असतात. एकटा रंग व एकटा मनुष्य गंभीर भासतो. या सर्व रंगांना परमेश्वराने एक वरदान दिले आहे ते म्हणजे एकमेकात हुबेहूब मिसळून जाण्याचे. एकमेकात हुबेहूब मिसळून गेल्यावर ते स्वतःचा रंग बाजूला ठेवतात आणि एक नवीनच अस्तित्व निर्माण करतात. रंगांचा एकमेकांशी असलेला सुयोग्य संग एक विशिष्ट बंध तयार करतो आणि त्यातूनच विविध रंग असलेली दुनिया प्रकट होते. दोन रंगांच्या मिश्रणातून तयार होणारा तिसरा रंग काहीवेळा आश्चर्य निर्माण करणारा असतो.

एका अर्थाने हे सर्व रंग मानवी जीवन, मानवी भावना यांचा आविष्कार आहेत. प्रत्येक रंग, प्रत्येक छटा विविध मानवी प्रवृत्तींचे प्रतीक आहे. आणि त्यासाठीच भारतीय संस्कृती या रंगांसाठी आपली कृतज्ञता व्यक्त करते. निसर्गाच्या, विविध रंगांच्या जास्तीत जास्त जवळ जाता यावे, यासाठीच रंगपंचमीचा उत्सव महत्त्वाचा आहे. या सर्व रंगांच्या आठवणीच्या निमित्ताने मानवी भावनांना वाट मोकळी करून देणे यासाठीच हा रंगोत्सव. इतक्या सगळ्या रंगांनी, छटांनी वसुंधरेला सजवणारा परमात्मा मात्र या सर्व रंगांपासून नामानिराळा आहे. म्हणूनच तर म्हणतात तो पाण्यासारखा आहे. पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिसमे मिला दो उस जैसा...



काही रंगांना जन्मजातच काही वरदान प्राप्त झाले आहे. पांढरा रंग त्यागाचं प्रतीक बिरुद घेऊनच जन्माला आला. निळा रंग गहन विचारांचे प्रतीक म्हणून प्रौढी मिरवतो. काळा रंग नकारात्मकतेचे प्रतीक म्हणून बदनाम झालेला आहे परंतु तोचअनेक चित्रांच्या बाहेर रेखाटनासाठी वापरला जातो.(बोर्डरिंग)

उगवती मावळती प्रमाणे आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर कोणता ना कोणता रंग आपली साथ देतो. आयुष्याच्या कोऱ्या कागदावर रंग भरताना इच्छा ,महत्त्वाकांक्षा यांच्या गडद रंगांपुढे माणुसकी, प्रेम याचे रंग फिके पडणार नाहीत याची काळजी मात्र घ्यायला हवी. तसेच अवाजवी लोभ,मोह यामुळे समाधान, आनंद याचा रंग उडणार नाही आणि रंगाचा बेरंग होणार नाही याचे भान राखायला हवे.


 आणि मग खर्‍या अर्थाने म्हणता येईल

"रंगुनी रंगात साऱ्या रंग माझा वेगळा"

रंगपंचमीच्या रंगीत शुभेच्छा


श्री. गुंजन हरी देव, सातारा.



Comments

  1. शब्दशः सर्वव्यापी विचार मंथन. अप्रतिम.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी