अभिव्यक्ती स्वातंत्र्य

 अभिव्यक्ती स्वातंत्र्य

समाज माध्यम हे केवळ माध्यम आहे. तो एखाद्या समस्येवरचा परिपूर्ण तोडगा असू शकत नाही.

समाज माध्यम ही व्यक्त होण्यासाठी मिळालेली सुवर्ण संधी आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्य उपभोगत असताना शब्द, संस्कार, सभ्यता, शिष्टाचार याच्या मर्यादांचे पालन व्हायलाच हवे.

राजकीय हेवेदावे असूही शकतात. पण संस्काराची किमान पातळी राखायला हवी. एखादा राजकीय किंवा ईतर विचार सगळ्यांना नेहमीच पटणारा असतो असेही नाही. त्यातही काही गैर नाही. विरोध होतो, होणार पण त्याला द्वेषाची किनार असता कामा नये. शेवटी आम्ही सारे भारतीय आहोत ही जाणीव जपायला हवी.

राजकीय विरोधाच्या परिसीमा गाठल्या गेल्या तर मतदान नावाचे ताकतवान शस्त्र लोकशाहीने प्रत्येकालाच बहाल केलेले आहे. एका बोटामध्ये, बटन दाबून मोठे परिवर्तन घडवून आणण्याची ताकत आहे.

समाज माध्यमे वैचारिक देवाणघेवाण करण्यासाठी आहेत. राष्ट्र घडवण्यासाठी, समाज मनामध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी या माध्यमांचे महत्त्वाचे स्थान आहे. स्वतंत्रपणे सत्याचे सामर्थ्य सर्वांच्या समोर साकारण्याची सकारात्मक सोय समाजमाध्यमे सहजतेने उपलब्ध करून देतात. 

जाणीव, सजगता जपता यायला हवी.भान ठेऊन आपण काय लिहितो, फॉरवर्ड करतो याचा विचार करायला हवा. आपल्या विचारांशी आपण एकनिष्ठ असावेच, त्या विचाराचा आग्रह कधीही सोडू नये. तो विचार इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करणे यात गैर काहीच नाही. परंतु हे करत असताना कळत नकळत एखाद्याने मर्यादा ओलांडल्या तर त्याचे खापर मात्र समाज माध्यमांवर नको. 

१) आपल्याला ज्या विषयाची माहिती नाही, ज्या विषयाचा आपला अभ्यास नाही त्यावर भाष्य करणे, प्रतिक्रिया देणे टाळावे.

२) घाबरून गप्प बसावे हा सुद्धा उपाय नाही. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टीवर व्यक्त होण्याचा अधिकार प्रत्येकालाच आहे. पण समाजात मानाचे स्थान असलेल्या व्यक्तींवर टीका टीपणी करताना विशेष भान राखायला हवे. आपण सामान्य असू तर अधिक खबरदारी घ्यायला हवी.

३) जन भावनेचा आदर राखला पाहिजे. सगळ्याच गोष्टी मी सगळ्यांना उघडपणे सांगायला हव्यात हा आग्रह नको. कारण ये पब्लिक है सब जानती है यावर विश्वास हवा. 

४)आपल्या वैचारिक विरोधकांमध्ये सुद्धा आपल्याबद्दल आदरयुक्त भीती, आणि नकळत स्नेह निर्माण करता आला पाहिजे. *हळु हळू विरोधक सुद्धा समर्थक व्हायला हवेत* अशी लेखणीची कमाल हवी. लोक तोडत नव्हे तर लोक जोडत, लोकसंग्रह करत आपले आयुष्य अधिक समृद्ध करता येते.


योग्य पद्धतीने व्यक्त झाले तर आपले शब्द आणि आपली लेखणी ही आपली प्रचंड मोठी ताकत आहे.चला तर मग सगळे मिळून काम करूया राष्ट्राला पुढे नेण्यासाठी.


भारत माता की जय ||

वंदे मातरम् ||


श्री गुंजन हरी देव

सातारा.

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी