चहा नावाचं अमृत
कधी सोलापुरी, पंढरपुरी कधी खास सातारी कधी काश्मिरी अनेक गावांच्या नावाचा, कधी इकडल्या तर कधी तिकडल्या भावाचा, तर कधी तंदुरी , कधी चुलीवरचा
चहा नावाचं अमृत
कशातही शोभतं.कधी कपात,कधी मगात, कधी कागदी द्रोणात, कधी ग्लासात , कधी कुल्लड मध्ये, काहीच सोय नसते तेंव्हा पेल्यात सुद्धा, बशीसकट आणि बशी शिवाय सुद्धा
चहा
कधी साखरेचा, कधी गुळाचा, कधी बिना शक्कर, कधी स्पेशल तर कधी टक्कर , कधी नुसत्या दुधातला, कधी कोरा, कधी लेमन टी म्हणजेच लिबुयुक्त.
चहा,
कधी आल्याचा, कधी वेलदोड्याचा , कधी जायफळाचा, कधी चहाच्या विशेष मसाल्याचा, कधी गवती चहाचा.कधी स्पेशल , कधी दाट दुधाचा कधी बासुंदीचा कधी मलईचा
चहा,
कधी पत्ती वाला, कधी डस्ट वाला,कधी फॅमिली मिक्स्चर, कधी आसामचा, कधी निलगिरीचा, कधी गोल्डन, कधी कडक,तर कधी दमदार....
चहा सारखाच लागतो
कधी टेन्शनसाठी,कधी कामातील उत्साह टिकवण्यासाठी, कधी शिणवा घालवण्यासाठी, कधी गेलेला मुड परत आणण्यासाठी, कधी दुःख विसरण्यासाठी तर कधी आनंद साजरा करण्यासाठी.... चहा हवाच
चहा नवीन नाती जोडतो, जोडलेली माणसं टिकवतो, कधी , चहा काम करतो, चहा काम करून घेतो.
चहा वेळ घालवण्यासाठी, कधी वेळा जुळवण्यासाठी,कधी वेळ निभावून नेण्यासाठी.
चहा
कधी गारवा म्हणून, कधी पाऊस म्हणून,कधी दिवसाची सुरुवात म्हणून.. कधी रेंगाळणारी दुपार पटापट पुढे जावी म्हणून,तर कधी रम्य संध्याकाळचे स्वागत म्हणून
चहा
कधी दमलेल्या आईसाठी, ऑफिसमधून आलेल्या बाबांसाठी, कधी मित्रांसाठी,पाहुण्यांसाठी आणि या सगळ्यांबरोबर माझ्यासाठी
चहा
खूप दिवसांनी भेट झाली म्हणून, खुशखबर समजली म्हणून, प्रमोशन झाले म्हणून, यश मिळाले म्हणून तर कधी काळजी मिटली म्हणून
मीटिंगला चहा, प्रवासात चहा, सेशनमध्ये चहा, अभ्यासात चहा, कामात चहा,फ्रेश आहे म्हणून चहा, फ्रेश वाटत नाही म्हणून चहा, कधी बदल म्हणून चहाच
रानात चहा, ऑफिसात चहा, साईटवर चहा, कट्यावरचा चहा, गाड्यावराचा चहा, चौकातला चहा, टपरीवरचा चहा, कधी प्रेमाचा तर कधी अमृततुल्य.
पण अनेक वेळा चहाची इच्छा असून सुद्धा तो मिळत नाही, कधी कधी पिऊन सुद्धा पिल्यासारखेच वाटत नाही.
एकंदरीत चहामहात्म्य न संपणारे असेच आहे. पण तरीही तुझ्या हातच्या चहाची सर कशालाच नाही हे मात्र नक्की. कधी आईसोबत, कधी पत्नी सोबत, तर कधी मित्रांसोबत.... चहा नेहमीच नात्यांमधील गोडवा वाढवतो.
श्री गुंजन हरी देव
सातारा









When it's about chai, it's always
ReplyDeleteEk aur cup ho jaye! ❤️