आमचे उस्तव... अखंड ऊर्जा स्त्रोत
*आमचे उस्तव... अखंड ऊर्जा स्त्रोत*
*नवरात्रोत्सव*
सज्जनांसाठी आश्वासकता आणि दुर्जनांचा संहार करण्यासाठीची कटीबद्धता म्हणजे नवरात्र. सातत्य, साधना, स्नेह, समर्पण ,सेवा या सगळ्यातून आपली सामाजिक आणि कौटुंबिक भूमिका बजावणाऱ्या मातृशक्तीच्या रौद्ररूपाची आठवण म्हणजे नवरात्र.
कंटाळवाणा पावसाळा संपत आलेला असतो. निसर्ग विविधतेने नटलेला, पशु, पक्षी, प्राणी सगळ्यांमध्ये एक आनंद ओसंडून वाहत असतो, नद्या,नाले दुथडी भरून वाहत असतात. चैतन्य स्वरूप विश्वाच्या कणाकणामध्ये व्यापून उरते.
संततधार ,पावसाळा यामुळे थकवा आलेले शरीर पुन्हा पूर्वपदावर येत असते. मंदावलेला जठराग्नी पुन्हा हळू हळू जागृत होऊ लागतो. काळोखाचे साम्राज्य बुडवून दिनकर पुन्हा नित्य नियमाने दर्शन देऊ लागतो.
पिकं बाहेर डोकावून पाहत आहेत. सकाळी, संध्याकाळी उबदार, दुपारी गरम तर रात्री आणि पहाटे थंडगार वातावरण आहे. जनावरांसाठी भरपूर हिरवा चारा उपलब्ध आहे. पावसाने दिलासा दिल्यामुळे कष्टकरी, कामकरी लोकांची पुन्हा पूर्ववत पळापळ सुरू झालेली आहे. असे हे दिवस.
किती करावे आणि काय काय म्हणून करावे असा प्रश्न पडावा असेच हे दिवस. समस्या न संपणाऱ्याच असतात. परंतु त्या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष करून आनंद उपभोगण्याची नवरात्री ही पर्वणी.
राजाधिराज प्रभू श्रीराम यांना लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी भगवती देवीने लंकाविजयचा आशीर्वाद दिला अशीही आख्यायिका आहे. तर दहाव्या दिवशी प्रभू रामचंद्रानी रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला.
अखंड नऊ दिवस दुर्गामातेने महिषासुराशी लढून त्याचा दहाव्या दिवशी वध केला. म्हणूनच तिला ‘महिषासुरमर्दिनी’ असेही म्हणतात. यानंतरच वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. नऊ दिवस देवीने दिलेल्या लढ्याची आठवण आणि वाईट गोष्टींंशी लढा देण्याचा संकल्प यासाठीच नवरात्रौत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.
मातृशक्ती ही या देशाची परंपरा आहे. राजमाता जिजाऊ, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि या परंपरेनुसार आपापल्या क्षेत्रात यशाची उत्तुंग शिखरे पादाक्रांत करत आमच्या देशाचे नाव सोनेरी अक्षरात कोरणाऱ्या सर्व माता, भगिनिंच्या कार्याला त्रिवार वंदन.
श्री गुंजन हरी देव
सातारा




त्रिवार वंदन
ReplyDelete