घराघरात राम ..मनामनात राम
*रामभक्त हो आपणही वाचा आणि शक्य झाल्यास पुढे पाठवा*
प्रभू राम आमची अस्मिता.....
प्रभू श्रीराम ही आमची प्रेरणा आहे. श्रीराम ही केवळ आस्था नाही तर आमच्या जीवनाचे सार्थक आहे.सर्व संदेह जिथे मावळतात ते अंतिम सत्य म्हणजे श्रीराम. आमच्या विजयाची गाथा ज्याला आम्ही श्रद्धापूर्वक अर्पण करतो ती प्रेरणा म्हणजे प्रभू रामचंद्र. आमच्या पराजयावेळी आम्हाला आत्मचिंतन करविणारी शक्ती म्हणजे प्रभू राम.
केवळ आमचा नव्हे तर अखिल विश्वाचा नियंता राम आहे, म्हणून तर समर्थ अभिमानाने सांगतात,
" आम्ही काय कुणाचे खातो, गुण रघुरायचे गातो !
त्रिभुवन पालक स्वामी तो राम आम्हाला देतो "
जिथे राम नाही तो स्वर्ग, त्रिभुवनाची सत्ता आम्ही नम्रपणे झिडकारून देतो. " नसे राम ते धाम सोडून द्यावे ! ". आमचे हे दैवत सज्जनांचे कैवारी व दुर्जनांचा कर्दनकाळ आहे. राष्ट्राचे, समाजाचे रक्षण करणारे आहे. धर्माचे, न्यायचे , नीतीचे पालन करताना स्वतः कष्ट सोसून आदर्श निर्माण करून देणारे आहे. आदर्श बंधू, आदर्श मुलगा, आदर्श पती, आदर्श राजा किती म्हणून वर्णन करायचे, आयुष्य वेचले तरी कमी पडेल. धीर, वीर, गंभीर, पराक्रमी, न्यायी, शरणागतरक्षक असे प्रभू श्रीराम आम्हाला प्राणाहूनही प्रिय आहेत. खरं तर हे दैवत एका समूहाचे,जातीचे,धर्माचे नाही ते अखिल विश्वाचे आदर्श आहे.
आमच्या समाजाला एका सूत्रात बांधून ठेवणारा धागा म्हणजे राम आहे. युद्धभूमीत रणकर्कश असणारे प्रभू शत्रूचा देखील मान राखणारे आहेत. म्हणूनच ते मर्यादापुरषोत्तम आहेत. जोपर्यंत हे जग अस्तित्वात असेल तोपर्यंत युगानुयुगे राम प्रभूंची किर्ती अजरामर आहे. एकवचनी एकबाणी, एकपत्निव्रत असे प्रभू श्रीराम यांचे भक्त असल्याचा अभिमान आम्ही बाळगतो.
प्रभू राम राष्ट्रावर, समाज बांधवांवर प्रेम करायला शिकवतात. रामचद्रांचे त्यांच्या जन्मस्थळी भव्य दिव्य मंदीर व्हावे एवढी मनोमन इच्छा होती. ती सुद्धा आता सत्यात साकारत आहे. त्यामुळे सर्व राम भक्तांना अत्यंत आनंद झाला आहे. यावेळी रामाचे नवरात्र थाटामाटात साजरे करायचे आहे. हे प्रभू साऱ्या जगताचे कल्याण कर अशी प्रार्थना करीत त्या भक्वत्सल रामाला शरण जाऊया.
जय श्रीराम !
राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय !!
जय हिंद !
भारत माता की जय !!



Comments
Post a Comment