आम्रपुराण
दहावीची परीक्षा देऊन सुमारे 35 वर्षाचा काळ लोटला. परंतु तरी क्षणातच त्या काळात जाता येते. अगदी आत्ता आत्ता घडले असेच वाटते. एखाद्या चित्रपटाचा ट्रेलर डोळ्यासमोरून जावा तसे दिवस पटापट निघून गेले. अनेक गोष्टी अगदी तेव्हा होत्या तशाच आहेत , बऱ्याच गोष्टी अंतर्बाह्य बदललेल्या आहेत. आंब्याची हाव ही अशीच एक गोष्ट, किंचितही न बदललेली भविष्यात बदलण्याची शक्यताही नसलेली.
महाशिवरात्रीला आंब्याचा मोहर शंकराला वाहतात. तिथपासूनच आंबा हा विषय मनामध्ये सुरू होतो. आंबा न आवडणारी व्यक्ती अतिशय दुर्मिळ असते. खरंतर सोसत नाही हे पटतं पण आवडत नाही असे असेल तर ते एक करंट लक्षणच म्हणावं लागेल. केवळ कैऱ्यांनी लगडलेले आम्रवृक्ष नव्हे तर आंब्याच्या मोहराने दाटलेले वृक्ष मनाला स्वर्गीय आनंद प्रदान करतात. अभ्यास करण्याच्या निमित्ताने आमराईतली दाट सावली सुद्धा मनसोक्त अनुभवलेली आहे. त्यामुळेच या आंब्याशी, आंब्याच्या झाडाशी, आंब्याच्या पानांशी एक अद्भुत नाते जोडले गेले आहे. कोणत्याही सणावाराला घराचा परिसर आंब्याच्या पवित्र पानांनी सजवताना मनाला अतिशय आनंद होतो.
आमच्या घराच्या समोरच आम्रवृक्ष असल्याने ती मैत्री अधिकच घट्ट झाली.साहजिकच मोहोराचा विशिष्ट वास, मोहोर झडून त्याचा फुलोरा जमिनीवर पडतानाचा काळ या सगळ्या प्रसंगात मी या मित्राबरोबरच असतो. अगदी पहाटेच्या प्रहरी आर्त स्वरातील कोकिळेच्या स्वर सप्तकांनी जाग आल्यावर अरुणोदयाच्या सप्तरंगी छटा हृदयात अधिकच खोलवर परिणाम करतात. लहानपणी कोकिळेच्या मागे गायन करून कोकिळेला खूप दमवलं सुद्धा आहे.
आम्ही लहान असताना अपार्टमेंट नव्हती. वाडा संस्कृती होती. वाड्याच्या मागे रिकामी जागा हमखास असायची तिथे निरनिराळी झाडे असायची. कधी कुठेतरी पेरूचे झाड, कुठेतरी आवळ्याचे झाड, कुठेतरी चिंचेचे झाड अशी अनेक झाडे असली तरी आंब्याची झाडे मात्र बऱ्याच ठिकाणी, हमखास असायची. मे महिन्याच्या सुट्ट्या लागल्यावर आमच्या बाळ गोपाळांच्या वानर टोळीची झाड पडायची आणि दहा-पंधरा कैऱ्या तोडून आणल्या जायच्या. त्यानंतर कुणीतरी घरातून तिखट मीठ आणायचं. एकत्रितपणेच त्याच्या फोडी केल्या जायच्या आणि अतिशय आनंदाने आपला पराक्रम साजरा करत, मोठी मेजवानी व्हायची. त्या काळात पार्टी म्हणजे असंच काहीतरी असतं एवढेच आम्हाला माहीत होतं. आणि अशा क्षणांचा आम्ही मनसोक्त आनंद लुटला. हॉटेलात जाणे, वाढदिवसाला केक कापणे असे प्रकार आम्हाला तेव्हा माहीत नव्हते. काही कैऱ्या कर्कश आंबट असायच्या. काही मात्र अतिशय स्वादिष्ट, कमी आंबट होत्या. खोबरी आंबा कच्चा खायला उत्तम लागायचा. काही वेळा गालाला चिक उतला आहे.
कैरीचे टिकणारे लोणचे, गुळ घालून केलेले लोणचे, कैरी खिसून केलेले सरबत, कैरी उकडून केलेले पन्हे इत्यादी पदार्थ उन्हाळा सुखकर करतात. कैरी आणि कांदा यांच्या एकत्र मिश्रणातून तयार झालेला छुंदा नावाचा पदार्थ देखील चांगला लागतो. कैरी उकडून गर काढून त्याला मेथीची फोडणी दिल्यावर मेथांबा देखील उत्तम पक्वान्न आहे.
लहानपणापासूनच आंब्याच्या या प्रेमामुळे, *आंब्यासाठी काय पण* असेच काहीसे होऊन गेले. या सगळ्याला खतपाणी घातले ते म्हणजे आमच्या आई-वडिलांनी. त्यांनी आंबा खायला घालताना कधीही परिस्थिती आड येऊन दिली नाही. जगातील सर्व फळे, पदार्थ, भोजन इतकेच नव्हे तर सर्व नैसर्गिक आणि मानवनिर्मित मिठायांमध्ये आंबा सर्वश्रेष्ठ आहे.
मी केवळ अमुक तमुक प्रकारचा आंबा खातो असे निष्ठापूर्वक सांगणारी व्यक्ती आंबाप्रेमी असू शकत नाही. खरा आंबा प्रेमी सर्व प्रकारच्या आंब्यांवर समान प्रेम करतो. म्हणूनच तो आंब्याशी खऱ्या अर्थाने सम रस झालेला असतो. अगदी जेवताना सुद्धा आंब्याचा रस वाटीच्या तळाला जाऊ देत नाही तोच खरा आंबा प्रेमी. भोजन प्रसंगी सुद्धा आंबा प्रेमी आंब्याच्या रसाच्या आग्रहाला नकार देत नाही आणि आपली निष्ठा रसा तळाला जाण्यापासून वाचवतो.
आमरसाच्या जेवणाला केवळ पोळीच हवी असा आग्रह चुकीचा आहे. पोळी असेल तर उत्तमच पण भाकरी असेल तरी देखील आमरसाचे वावडे असायचे कारण नाही. कधी प्रसंगी नुसताच आमटी भात असेल तरीदेखील त्यानंतर एक दोन वाट्या आमरस खाणे यात गैर काहीच नाही. कधी पोट जड असेल म्हणून भोजन करणार नसू तर केवळ एक दोन वाट्या आमरस पिऊन राहिलेले उत्तम. काहीजण आमरसात दूध वगैरे मिसळतात पण ते आम्हाला मान्य नाही. आम्ही पुरणपोळी वर मनापासून प्रेम करणारी माणसं. पुरणपोळी आणि आमरस एकाच वेळी असतील तर आमच्या मनात कधीही द्वंद उत्पन्न होत नाही. पुरणपोळी आमरसात कुस्करून त्यावर मनसोक्त ताव मारून आम्ही आमचा निपक्षपातीपणा सिद्ध करतो.
सत्यनारायणाच्या तीर्थाला वापरतात असा एखादा छोटासा चमचा टाकून चमच्याने आमरस पिणे आम्हाला जमत नाही. आम्ही वाटीनेच आमरस पिणे पसंत करतो. आमच्या लहानपणी हापूस ची आवक कमी असायची आणि त्यामुळे पायरीचा रस जास्त वेळा व्हायचा आता मात्र परिस्थिती विरुद्ध आहे. चांगला मधुर आणि रसाळ पायरी आंबा क्वचित मिळतो आणि सर्रास हापूस आंब्याचा रस केला जातो. पण खरा रस पायरी आंब्याचाच. याशिवाय अनेक प्रकारचे रायवळ आणि देशी आंबे आम्ही खाल्ले आहेत. पूर्वी आंबा पिळून त्याची चव तीर्थाप्रमाणे बघायची आणि मगच तो खरेदी करायचा अशी प्रथा असे. आसपासच्या गावांमधून अनेक प्रकारचे रायवळ आंबे बाजारामध्ये येत. अनेक वेळा आंबा खरेदी फसगत देखील झालेली आहे.
आमरस खाणे आणि आंब्याच्या फोडी चिरून खाणे एवढ्याच आंब्याचा आस्वाद घेण्याच्या, पद्धती नाहीत. आंबा मऊ करून पिळून खाणे हा लहानपणीचा जेवण झाल्यानंतरचा रोजचा उद्योग असायचा. बऱ्याच प्रकारचे आंबे वरून गोड पण कोईला मात्र आंबट असायचे. गोटी आंबा, रायवळ हे जास्त प्रमाणत पायरी, हापूस कधीतरी असायचे.
एखाद्या आंब्याला शेपू सारखा उग्र वास यायचा. त्याला शेपू आंबा म्हणतात. मलगोबा सारख्या दोन-तीन आंब्यांचा लिटरभर रस होतो. बदाम हापूस, लालबाग असे काही आंबे साधारण पाऊस सुरू झाल्यावर सुद्धा उपलब्ध असतात. त्यानंतर आलेला केशर हापूस मात्र फारच भाव खाऊन गेला. बरेच वर्षांपूर्वी या केशर हापूस आंब्याची शंभर नगांची पाटी मी लिलावात विकत घेतली होती.
मध्यम मार्ग काढून सगळ्यांनाच खुश करणारे काही लोक असतात अशा प्रकारचा आंबा म्हणजे तोतापुरी. कैरी सुद्धा आंबट नाही आणि पिकल्यावर देखील गर्व करण्याएवढा स्वाद आणि माधुर्य नाही, तरीही कुठेही आणि कधीही खाल्ला तरीही सुखावह.
इतर फळांप्रमाणे आंब्याचा सिझन वगैरे असे काही असते यावर माझा विश्वास नाही. कारण आंब्याचे लोणचे, साखर आंबा, गुळांबा अशा प्रकारे आंबा स्वयंपाक घरात कायमस्वरूपी वास्तव्यास असतोच. साखर आंब्याचे सुद्धा विविध प्रकार आहेत. साध्या कैरीचा साखर आंबा, तोतापुरीचा साखर आंबा, पिकलेल्या हापूस आंब्याचा साखर आंबा अशी विविध पकवाने वर्षभर आपले ताट सजवत असतात. मधूनच कधीतरी आंबावडी, अंबा बर्फी, आंब्याचा आटवलेला रस, आंबा पोळी अशा स्वरूपात देखील भेटी घडते.
मजला दिसला आम्रतरु
अन् मन हे हरपून गेले
नजर राहिली खिळून
आणि करही जुळून आले
हिरवे हिरवे मोहपुंज ते
हिरवा पोपट डोले
नाही दिसला दडून बसला
कुहुकुहू कोकीळ बोले
चैत्रमासीचा बहर घेऊनी
राजा हा वनीचा
मधुर मेवा घेऊन आला
या पृथ्वीवरचा
थाट पाहुनिया राजाचा
ग्रीष्म ही पळून गेला
रखरख क्षणभर दूर पळाली
वसंत फुलवीत आला
पाना आडूनी दडून डोकवी
डोले फांदीवरती
देवाघरची हीच मिठाई
आंबा त्याला म्हणती
श्री गुंजन हरी देव
सातारा

Very nice.👍👍#Mango lover
ReplyDelete