घर पहावे बांधून....

 

पूर्वीच्या काळी घर पाहावं बांधून... असं लोक म्हणायचे. आणि ते खरंच होतं. उपलब्धता खूप कमी होत्या. कर्जाची सहज उपलब्धता नसायची. अर्ज केल्यानंतर दोन दोन वर्ष कर्जाचा नंबर यायला लागायचा. कर्ज मंजुरी मिळाल्यानंतर सुद्धा घर बांधणी सोपी नव्हती. सिमेंट,लोखंड यासारख्या वस्तूंचा तुटवडा असायचा. बांधकाम कंत्राटदारांची संख्या सुद्धा मर्यादित होती. एकंदरीत नवीन घरापेक्षा नवीन घर बांधण्याचा सोहळा जास्त उत्साहवर्धक असायचा.  

बहुतांशी लोकांची आर्थिक परिस्थिती खऱ्या अर्थाने मध्यमवर्गीय होती. अनेकजण भाड्याच्या घरामध्ये रहात असायचो. परंतु तो काळ सोनेरी होता. आपल्याकडे नसलेल्या गोष्टींच्या चिंतेपेक्षा आपल्याकडे असलेल्या गोष्टींचा आनंद होत असायचा. आजकाल माणसं घर शोधत फिरतात पण त्या काळात घरं माणसं शोधत फिरायची असे म्हटले तर वावगे न ठरावे. 

त्या काळी स्थळं सांगून यायची आणि चर्चेतून लग्न ठरायची. अगदी तसेच सहज चर्चेतून कोणीतरी जागा, प्लॉट सुचवायचे. मी आणि माझा अशी संस्कृती नव्हती चांगले पाच-सहा जण प्लॉट बघण्यासाठी जायचे. प्लॉट डोंगराच्या पायथ्यालगत, थोडा गावाबाहेर असायचा.  

आसपास कधी एखादा मोठा ओढा असायचा ज्यामधून डोंगरातील पाणी वहायचे. आसपास परिसर काटे कुट्याची झाडे, झुडपे असायची. आज मात्र अशा सर्व परिसरात सिमेंटचे जंगल आहे आणि शेवटचे वाटणारे प्लॉट मध्य स्थानी आहेत. 

परमेश्वराने त्याकाळातील लोकांना भले आर्थिक बळ कमी दिले असेल परंतु त्यांचा वैचारिक पाया मात्र भक्कम होता. त्यामुळे या लोकांनी केवळ माझे घर हा विचार न करता पुढच्या पिढ्यांचा सुद्धा विचार केला. त्यांच्या पुण्याईने या वास्तू सुद्धा अतिशय भाग्यवान होत्या ज्यामध्ये घरातील सर्व सदस्य अनेक वर्ष गुण्यागोविंदाने राहिले येणाजाणाऱ्यांचा देखील राबता असायचा. याचं कारण घर घेतानाचा त्यांचा दृष्टिकोन आणि भाव हा निराळा होता. माझी मुलं बाळ, कुटुंबीय रहावेत त्यांची भरभराट व्हावी ही वास्तू मला फलदायी व्हावी या अपेक्षेने बांधलेली ती घरी असायची. परंतु आजच्या काळात मात्र हे घर ही माझी आत्ताची गरज आहे. उद्याचे माझे मलाच माहित नाही त्यामुळे रिसेलला पैसे आले पाहिजेत हा विचार करूनच घर घेतले जाते.

त्याकाळी गवंडी, बिगारी यांच्याबरोबर सतत थांबून आपल्याला हवे तसे काम होते आहे ना ? याची देखरेख ठेवण्यासाठी घरातील किमान एक व्यक्ती साईटवर थांबायचा. स्वतः मोटर सुरू करून दिवसातून दोन वेळा बांधकामाला पाणी मारल्याचा आनंद काही औरच असायचा. 

सर्व कुटुंबीय आठवड्यातून किमान एक दोन वेळा साईटवर एकत्र यायचेच. लाफ्ट कोणत्या खोलीत किती असावे, कपाटे किती आणि त्यांची जागा कोणती, देवघर नक्की कोठे असेल असे अनेक प्रश्न कुटुंबीय तिथेच सोडवत. त्यामुळे आरसीसी स्ट्रक्चर सोडले तर बाकीच्या गोष्टीत आर्किटेक्टची हुषारी आणि विद्वत्ता या निर्णयांपुढे फिकी पडायची. वास्तुशास्त्र वैगरे असले किडे कधी आसपासही फिरकायचे नाहीत. मोघमात पूर्वेकडे प्रवेश, ईशान्य कडे देवघर एवढे माहीत असायचे. घरातील सर्वजण बांधकाम विषयातील तज्ञ आहेत याची पदोपदी प्रचिती यायची. सामान्य ज्ञानावर इतके उत्तम काम करणारे हे तज्ञ पाहिले की सरकारने त्या विशिष्ट विषयातील म्हणजे बांधकाम क्षेत्रातील अभ्यासक्रम का निर्माण केले असावेत प्रश्न मनामध्ये पडायचा.

काम करणाऱ्या जाणकाराला आपल्याला कळत नसताना सुद्धा सल्ला देण्याचा आनंद अनुभवायचा असेल तर एकदा स्वतः घर बांधून बघाच. थोडे सिमेंट वाढवा, किंवा सिमेंट भरपूर वापरा पण नासाडी नको असे सल्ले येता जाता द्यायलाच पाहिजेत. नाहीतर दिवसभर तिथे थांबल्याचा उपयोग काय. सिमेंट कालवताना माल नीट कालवा, माल गरगरीत झाला पाहिजे असे म्हणून आपल्याला त्यातले समजते हे गवंड्याला सांगणे आणि उगाच इंप्रेशन मारणे हे सुद्धा जमायला हवं. सगळं काम लाईन दोरीत हवं, ओळंबा बघा, लेव्हल चेक करा अशा गोष्टी सुद्धा तिथं राहून हळूहळू कळायला लागतात.


मग हळूहळू लाकूड खरेदी, सुतार त्याच्याशी ठराव, दारेखिडक्या याची नक्षी यावर घरातल्या सगळ्या तज्ज्ञांची मते मतांतरे. सुतारने दिलेली डिझाईन आणि आपण सांगितलेले डिझाईन यातून उदयाला आलेले एक नवीनच डिझाईन शेवटी साकार व्हायचे.त्याकाळी म्हणजे साधारण 30-35 वर्षांपूर्वी सागवानाची दारं असायची. कलाकारही नक्षी काढताना जीव ओतून काम करायचे. पैशाबरोबर समाधानासाठी काम करणारी मंडळी यानिमित्ताने जवळून बघायला मिळायची. बरेच वेळा ही कलाकार मंडळी काम अर्धवट सोडून पळून जातात त्यातून होणारा मनस्ताप, पळापळ हा एक कटु अनुभव असतो. यामध्ये उत्तर शोधताना आपली कौशल्ये पणाला लागतात. अखेरीस काम झाल्यावर एक अद्भुत आनंद अनुभवल्याखेरीज कळत नाही.


किचन कट्याचा आकार,कट्ट्याच्या टाइल्सचे डिझाईन यावर भली मोठी चर्चा, मग दोन चार ठिकाणी जाऊन खूप सारे प्रकार बघायचे. पण दुकानदार सुद्धा गिऱ्हाईकपेक्षा हुषार असायचे ते गृहलक्ष्मीच्या डोक्यात एखादी गोष्ट अशी पटवायचे की भरपूर फिरून सुद्धा पहिली बघितलेली वस्तु फायनल व्हायची.

कोणत्या खोलीला कोणता रंग असावा हे लवकर ठरायचे नाही. रंगारी शेड कार्ड आणून द्यायचा. खूप विचार करून त्या शेड मधील प्रत्येक खोलीचा रंग ठरवला जायचा आणि रंगकाम झाल्यावर शेडमधला रंग आणि प्रत्यक्ष रंग या भलताच फरक जाणवायचा. साहेब शेडकार्ड वर छोटीशी स्पेस असल्यामुळे अंदाजे येत नाही. संपूर्ण भिंत बघितल्यावरच रंगाचा अंदाज येतो असे उत्तर देऊन रंगारी रिकामे व्हायचे. 

खरंतर ज्याची नजर कलाकाराची आहे, आणि त्याला जीवनात आनंद घ्यायला आवडतो त्यांच्यासाठी घर बांधणे ही एक पर्वणी आहे. घर बांधताना माणूस विजेची बटणे सुद्धा हव्या त्या आकारात कशी मिळवता येईल यासाठी पळापळी करतो. सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्या करून घेण्याचा प्रयत्न करतो. मग फ्रीज चा पॉईंट , पॉवर पॉईंट कुठे असावे हे आपल्याला ठरवता येते. त्याकाळी वॉशिंग मशीन, एसी, मायक्रोवेव्ह अशा गोष्टींची उपलब्धता मध्यमवर्गीयांसाठी नव्हती. 

"अशा रीतीने घरातील सर्व कुटुंबीयांच्या सहभागाने तयार झालेल्या वास्तूला निर्माणापासूनच घरपण प्राप्त होतं. अशी वास्तू सर्व कुटुंबीयांच्या भावनांशी एकरूप झालेली असते. तिथे कधीच एकटेपणा जाणवत नाही कारण अशा वास्तुतला प्रत्येक दगड आणि वीट बोलकी असते. इथे बाहेर गेलेल्या प्रत्येकासाठी आतुरतेने वाट पाहणाऱ्या नजरा असतात, अडचणीत असलेल्या प्रत्येकासाठी हक्काचा आधार असतो, धरपडणाऱ्या व्यक्तींना न मागताही प्रेमाचा सल्ला असतो, येणाऱ्या प्रत्येक अतिथीचे हसतमुखाने स्वागत करणारे संस्कार असतात. कुटुंबाबरोबरच नातेवाईक, मित्र मंडळी, शेजार पाजारी यांच्यासाठी स्वागताला "दार घराचे सदैव उघडे" असते. अशी वास्तू म्हणजेच घर. यालाच कुटुंब म्हणतात. हेच जीवनाचे सार्थक.*


आजकाल घर बांधण्याच्या पद्धती बदलल्या. अपार्टमेंट पद्धती आली. यामुळे यातील आणि गोष्टीचा आनंद भलेही घेता येत नाही परंतू अंतःकरणामधील भाव मात्र अजूनही तसाच आहे.


कवयत्री विमल लिमये यांची अप्रतिम कविता अशा घराचे वर्णन तंतोतंत करते .


घर असावे घरासारखे 

नकोत नुसत्या भिंती

इथे असावा प्रेम-जिव्हाळा

नकोत नुसती नाती


त्या शब्दांना अर्थ असावा

नकोच नुसती वाणी

सूर जुळावे परस्परांचे

नकोत नुसती गाणी


त्या अर्थाला अर्थ असावा

नकोत नुसती नाणी

अश्रूतुनही प्रीत झरावी

नकोच नुसते पाणी


या घरट्यातुन पिल्लू उडावे

दिव्य घेऊनि शक्ती

आकांक्षांचे पंख असावे

उंबरठ्यावर भक्ती


श्री गुंजन हरी देव

सातारा



Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी