गेले ते दिन गेले.......



ते मंतरलेले दिवस होते. उपलब्धता कमी होत्या परंतु समाधान, तृप्ती , कृतार्थता सदैव आसपास वावरत असत. इच्छा अपेक्षा यांच्या ओझ्यामुळे कोणीच फारसा वाकलेला नसायचा. अपूर्णतेत सुद्धा गोडी होती. आहे त्यातील थोडे इतरांना देणे ही बाब फोटोपुरती मर्यादित नव्हती कारण फोटो काढण्याची सुविधा केवळ स्टुडिओ मध्येच उपलब्ध होती. आपला परिसर, आपले लोक अशी आपुलकीची भावना होती त्यामुळे अनेकांच्या प्रतिमा स्नेहभावाने आणि प्रेमाने हृदयात जपल्या जायच्या.

घरातल्या घरात चप्पल घालतात हे माहीत झालं नव्हतं. बऱ्याच लोकांच्या पायात चप्पल नसायच्या सुद्धा. स्लीपर नावाची चप्पल बंद बदलून बदलून चपलेच्या टाचेला भोक पडेपर्यंत लोक वापरायचे. पाय पोळणे हा केवळ वाक्प्रचार नाही याची जाणीव आमच्या पिढीला आहे. चप्पल हे पायाची शोभा वाढवण्याचे साधन नव्हते. तर पायाला बळ देणारे म्हणजे पादत्राण असायचे. बहुतांशी लोक कोल्हापुरी म्हणजे चामड्याच्या चप्पल वापरायचे. करकर असा आवाज करणारी चप्पल उगीचच भाव खाऊन जायची.

केळफुलाची भाजी असली की केळफूलाच्या आवरणाचे बुट घालणे सगळ्या बालगोपाळांचा खेळ असायचा. चप्पल घालणे हे बंधन वयाने मोठ्या असणाऱ्या लोकांसाठी होतं. लहान मुलांना सुट असायची. याची  कारणे म्हणजे एकतर चप्पल नसायची , असली तरी सापडायची नाही, किंवा हरवलेली असायची. 

कोणी खेळायला बोलवायला आले की तसेच धूम ठोकायचो. चप्पल घालण्याएवढा वेळ सुद्धा वाया जायचा नाही. चुकून चप्पल घातलीच तर लपंडाव, पकडापकडी खेळताना कुठेतरी काढून ठेवली की तिथेच विसरायची. पुन्हा भागाबई... आहेच. 

चांगली ब्रँडेड चप्पल घेणे हा विचार सुद्धा शिवयचा नाही. कारण दर महिन्याच्या सामानाच्या यादीतील हा घटक असायचा. चप्पल हरवली नाही हा आनंद फार काळ टिकायचा नाही. चप्पल तुटणे हे नित्याचेच. तुझ्या पायाला काटे आहेत का ? असे आई म्हणायची. चप्पलचा अंगठा तुटायचा, बंद तुटायचा. काही वेळा मधून दोन तुकडे सुद्धा झाले आहेत.

नवीन चप्पल पायाला लागायची. घोटा, टाचेच्या मागे जखम सुद्धा व्हायची. मग चप्पलला खोबरेल तेल लावले जायचे. हल्ली लागणाऱ्या चप्पल कोठे गायब झाल्या कोण जाणे ?

चप्पल केवळ पायाच्या संरक्षणासाठी असते एवढाच विचार नवीन पिढीला माहित आहे. तिच्या बाकीच्या उपयोगांविषयी नवीन पिढी अवगत नाही. कॉलर पासून सुरु झालेली भांडण हळूहळू खाली उतरत चप्पल पर्यंत येऊन थांबायची.  पालकांसाठी सुद्धा हे महत्त्वाचं हत्यार होतं. चिंचा, आवळे, कैऱ्या पाडण्यासाठी सुद्धा चप्पल उपयोगी पडायच्या. पहिली चप्पल झाडावर अडकली आता उरलेल्या एका चप्पलचा काय उपयोग असे म्हणत दुसरी चप्पल सुद्धा. पडलेल्या कैरीचा आनंद घरी आल्यावर बाहेर पडायचा. चप्पल क्रिकेट खेळताना स्टंप म्हणून, बॉलिंग टाकण्याच्या ठिकाणाची खूप म्हणून उपयोगी पडायच्या. चप्पल तुटल्यावर सुद्धा चामड्याच्या तुकड्यापासून गलोरी तयार व्हायच्या.

वडीलधाऱ्या माणसांना चप्पल झिझवाव्या लागायच्या हे मात्र नक्की. कारण दुचाकींची मुबलकता नव्हती. सायकल असणे सुद्धा भूषणावह होते. चालणे म्हणजे नित्याचेच. ठरवून मॉर्निंग वॉक करायची गरज त्याकाळी  नसायची. आज किती किलोमीटर चाललो, किती कॅलरी खर्ची पडल्या असा हिशेब नव्हता. 

फाजील कौतुकं नकोत पायातली वहाण पायातच बरी.. असेही लहान मुलांना उद्देशून म्हंटले जाई. आम्ही कुठे चप्पल डोक्यावर घ्या म्हणत असायचो ? पण बोलायची टाप नसायची. चपलेने सडकीन अशी प्रेमाची भाषा घरातले लोक, मास्तर वापरायचे. चपलेचा नंबर माहीत असणे, चप्पल ओळखीची असणे असे परंपरागत वाक्प्रचार रूढ होते.

तसा आमच्या चपलांना बरेच वेळा सन्मान सुद्धा प्राप्त झाला आहे. एखाद्या ठिकाणी चप्पल घालून गेल्यावर, महाराज आपल्या खडावा/पादुका दूर काढून आलात तर बरं होईल, असं समजावलं जायचं. 

आता घरी घालायची चप्पल, ऑफिसला जाताना घालायचे बुटाचे दोन चार जोड, ट्रेकिंग आणि मॉर्निंग वॉक साठीचे स्पोर्ट शूज, विशिष्ट प्रसंगी घालता येईल अशी कोल्हापुरी चप्पल, जवळपास घाऊन जाता येईल अशी चप्पल असे माणशी किमान दहा जोड सुद्धा असतात. आणि तरीही आपल्याला आवडणारे आणि गरजेचे वाटणारे जोड खरेदी करण्याची ईच्छा शिल्लक असतेच. 

शेवटी मनाच्या ईच्छा कितीही  पुरवल्या तरी अपेक्षा वाढतच जातात. कुठे थांबायचं हे जोपर्यंत आपण मनाला दटावून सांगत नाही तोपर्यंत हे मन सोकावतच जातं. नाहीतर कितीही मोठं असलं तरी माणसाला घर पुरत नाही आणि चपलांना खोकं (कपाट ) पुरत नाही.. हे असंच सुरू राहणार.

*श्री गुंजन हरी देव*
सातारा.

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी