चत्वार मुक्ती भाग ४ स्वरूपता


स्वरूपचि व्हावें ते स्वरूपता- । तिसरी मुक्ती ॥ 

देवस्वरूप जाला देही । श्रीवत्स कौस्तुभ लक्ष्मी नाहीं ।

स्वरूपतेचें लक्षण पाहीं । ऐसें असे ॥ 

.......ग्रंथराज दासबोध

सलोकतेमध्ये सानिध्य आले मग समीपतेमध्ये जवळीक निर्माण झाली. हळूहळू ही जवळीक वाढवत जायची इतकी की आपणही त्याचे स्वरूप होऊन जायचे. एकरूप, अभिन्न व्हायचे. अशावेळी देहत्व बाजूला राहते आणि आत्म्याचा साक्षात्कार होतो. 

संतांची अवस्था अशी असते. ते स्वरुपी एकरूप होतात. देवाला झालेल्या त्रासामुळे ते व्यथित होतात. साहजिकच संतांना होणारा त्रास परमेश्वराला सुद्धा सहन होत नाही. मग जनाई साठी तो जाते ओढतो, नामदेवांचे पाय चेपतो आणि चोखोबांची गुरे सुद्धा राखतो. प्रभू रामराया शबरीची उष्टी बोरे खातात, भगवान श्रीकृष्ण द्रौपदीची लाज राखतात. समर्थांना साक्षात प्रभू श्रीरामचंद्र अनुग्रह देतात.

देव सर्वस्‍व भक्तांचा । देव भक्त दुजें नसे । संदेह तुटला मोठा । आनंदवनभुवनीं ।।४५।।

देव भक्त येक जाले । मिळाले जीव सर्व हि । संतोष पावले तेथें । आनंदवनभुवनीं ।।४६।।

खरे तर हे सर्व चढत्या आनंदाचे द्योतक आहेत. याची गोडी लागणे/असणे म्हणजे पूर्वजन्मीचे सुकृत.

म्हणून जगद्गुरु तुकोबाराया म्हणतात

बहुत सुकृताची जोडी

म्हणून विठ्ठल आवडी

स्वरूपी लीन झाल्यामुळे संत आणि ईश्वर यांच्यात काहीच फरक रहात नाही. त्यामुळे संतांना सदैव शरण जावे.

जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात

संत हेच भूमीवर

चालते बोलते परमेश्वर

राष्ट्रगुरु समर्थ रामदास स्वामी सुद्धा हे सांगतात

साधू दिसती वेगळाले |

परी ते स्वरुपी मिळाले |

अवघे मिळोन येकचि जाले |

देहातीत वस्तु ||

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी