पणती जपून ठेवा, अंधार फार झाला
थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला
पणती जपून ठेवा, अंधार फार झाला
अंधार हे अज्ञानाचे तर उजेड हे ज्ञानाचे प्रतीक मानले गेले आहे. त्यामुळे प्रकाश हे तेज, शौर्य,वृद्धी, संकल्प, भरभराट याचे द्योतक आहे.म्हणूनच वाढदिवसाला या दिव्याप्रमाणे तेजस्वी हो असे म्हणत औक्षण करण्याची आमची परंपरा आहे.
निसर्गाशी एकरूप झालेल्या आमच्या संस्कृतीचा आम्हाला अभिमान असायला हवा. आषाढात सर्व बाजूंनी मेघ दाटून आलेले, सर्वत्र काळोख पसरलेला, अशातच पावसाचा भडीमार, निसर्गाने सुद्धा रौद्र स्वरूप धारण केलेले... आयुष्य कसे कोंडून ठेवल्यासारखे जाणवते.
सगळे कसे कंटाळवाणे, खिन्न, उदास .... आरोग्याला सुद्धा त्रासदायक ठरणारे... अंगदुखी, ताप, खोकला असे संसर्गजन्य आजार याच दिवसात पसरतात. उजेडाच्या आणि उन्हाच्या अभावामुळे अनेक गोष्टी कुजतात त्याची दुर्गंधी, चिखल, सततच्या ओलसरपणामुळे नुसता वैताग येतो. कामात उत्साह राहत नाही. अति पावसामुळे पुर, लँड स्लाईड अशा घटना मन सुन्न करतात.
अशातच येणारी अमावस्या म्हणजे आषाढ अमावस्या... जणूकाही मनुष्याला भीती दाखवते... या काळात किमान विजेचे दिवे आहेत... परंतु पूर्वीच्या काळात विजेचे दिवे सुद्धा नव्हते....
परंतु अशा सर्वानाही पुरून उरणारी अशी आमची भारतीय संस्कृती... आषाढ शुद्ध अमावस्येला आम्ही दिव्यांची अमावस्या असे देखील म्हणतो... या दिवशी कणकीचे दिवे केले जातात... काही ठिकाणी बाजरीची फळे देखील करतात..
बाजरीचा रवा काढून त्याचा गूळ घालून शिरा केला जातो आणि उकडीच्या मोदकाप्रमाणे त्याची फळे तयार केली जातात नंतर गरम दुधात कुस्करून हा पदार्थ खायला प्रचंड मजा येते.
तसेच कणकीची फळे... कणकीमध्ये थोडासा सोडा घातला जातो.. गुळाच्या पाण्यात कणिक मळायची... आणि त्याचे दिवे करून पुन्हा उकडीच्या मोदकाप्रमाणेच शिजवायचे... यामध्ये तूप भरून खायला खूप मजा येते.
असे हजारो अंधार आयुष्यात येतात आणि येतीलही, परंतु अशा अंधाराला आम्ही पुरून उरणारे आहोत ,असे प्रतिकूलतेला ठणकावून सांगणारी आमची संस्कृती आम्हाला अभिमानास्पद आहे.
अंधारातून उजेडाकडे नेणारी... नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वाटचाल करायला शिकवणारी ही माती आहे.
डर न दिखाना वक्त हमें तुम
भविष्य की ओर निकल पडतें है
घेर लिया जब अंधेरो ने
हम हाथ में दीप लीये चलते है !!
दिवा हे भरभराटीचे, समृद्धीचे, आरोग्याचे, दीर्घायुष्याचे प्रतीक आहे.... म्हणूनच समाजाला उजेड देण्यासाठी आपले आयुष्य जाळणारा हा दिवा आमचा आदर्श आहे. त्याग आणि समर्पण या आमच्या यशाच्या किनारी आहेत.
हे सगळं सहन केल्याचं बक्षीस म्हणून मनमोहक असा श्रावण आपल्या भेटीला येत आहे. चला तर सज्ज होऊया त्याचे स्वागत करायला.
श्री गुंजन हरी देव,
सातारा.


छान मांडले आहेत... खरतर आपल्या सर्वच परंपरा अर्थ गर्भ आहेत अभिनंदन...
ReplyDeleteधन्यवाद
DeleteTouching all corners of the descriptions. Fantastic.
Deleteखूप खूप धन्यवाद सर
Delete