आईचा हात....
शनिवारचा दिवस होता. मारुतीरायांसाठी आणि शनीसाठी रुईची हिरवीगार विस्तीर्ण पाने आणली. ईश्वर म्हणजे कलेचे अधिष्ठान. ईश्वराला भाव जास्त प्रिय असतो. रुईच्या पानांचा हार केला. आईला शनीला जाऊन येतो असे सांगितले. तेवढ्यात हातात सुट्या पैशाचा डबा घेऊन आई आली. संध्याकाळच्या वेळी पावसामुळे अंधारून आले होते. आईने डब्यात हात घातला आणि हाताला आलेले एक नाणे काढून मला दिले. मी ते तसेच खिशात ठेवले.
मारुतीरायांना, शनीला हार घातला प्रदक्षिणा घातली तेवढ्यात आईने पैसे ठेवायला सांगितले होते ते आठवले. खिशातून काढलेल्या नाण्यावर नजर गेली तेव्हा समजले तो वीस रुपयाचा ठोकळा होता. नजरेसमोर असलेला देव वेगळा होता आणि हृदयात साठून असलेल्या देवाच्या विचारांनी मनात काहूर निर्माण झाले. *"मित्रांनो, हातचं राखून न ठेवणारा हात केवळ आईचाच असू शकतो.*
आईचा हात आहेच असा. देताना कधीही कमी पडणार नाही. तिने सहज हाताने देवासाठी काढून दिलेली नाणेसुद्धा खणखणीत निघाले. तो हात जादूचा आहे. त्या हाताला हातचे राखून न ठेवता भरभरून देणे माहित आहे. दुसऱ्याला दिल्याने आपल्याला कधीच कमी पडत नाही हे याच हाताने आम्हाला शिकवले. उत्तम हेच दुसऱ्याला द्यावे हीच तिची शिकवण. दुसऱ्याचा आत्मा जाणावा. कोणाचेही काहीही कधीही फुकट घेऊ नये आणि तशी अपेक्षाही करू नये. प्रत्येक जण प्रपंचासाठी चार पैसे मिळावे म्हणूनच कष्ट करतो. असे विचार ऐकतच आम्ही लहानाचे मोठे झालो. दुसऱ्याला देण्यासाठी पैशाची श्रीमंती लागत नाही पण मनाचा मोठेपणा मात्र नक्कीच लागतो.
याही पुढे जाऊन देणारे आपण कोणीही नसतो. आपल्याला देणारा आहे म्हणून आपण आहोत ही भावना महत्त्वाची असते. अन्नपूर्णेच्या स्वरूपात याच हातामुळे घरातल्या सगळ्यांनी, आल्या गेल्या पै पाहुण्यांनी पोटाला तृप्त केले आहे. या हाताने केलेला स्वयंपाक कधी कमीच पडला नाही. या हाताची चव काही न्यारीच आहे. त्याच्यापुढे अमृतही फिके पडेल.
आयुष्यात कोणतेही प्रसंग आले तरी अजूनही हाच आधाराचा हात सगळं काही सावरून नेतो. आशीर्वादाचा हा हात डोक्यावर असला की जगातली कोणतीही आव्हानं खुजी वाटतात. लहानपणी चांगल्या सवयी लावताना याच हाताने दिलेल्या रट्ट्यांमुळेच आपण आजचे दिवस पाहू शकलो. लहानपणी याच हाताने माझा छोटासा हात हातात घेऊन मला लिहायला शिकवले. पुस्तकावरच्या ओळीवर बोट ठेवून वाचायला शिकवले. लहानपणी याच हाताच्या आधाराने आपण घराबाहेर पहिलं पाऊल ठेवलं होतं.
अजूनही आजारपणात हा हात कपाळावर टेकला की औषधे आणि गोळ्या कित्येक पटीने लवकर लागू पडतात.
मित्रांनो, माझी काय आणि तुमची काय आई ही आईच असते. या हाताची जाणीव ठेवणे या पलीकडे या हातासाठी आपण काय करू शकतो ? तुम्ही आम्ही कदाचित पैशाने कितीही श्रीमंत झालो तरी या हातावर काही ठेवावे एवढे आपल्या हाताचे भाग्य नाही. *शेवटी काय या हातात सगळं काही सोपवायचं आणि हा हात हृदयाशी घट्ट धरून ठेवायचा इतकेच.*
जय जय रघुवीर समर्थ..
श्री. गुंजन हरी देव

Comments
Post a Comment