शारदीय नवरात्र पुष्प १ ( जन्मदात्री आई आणि भारत माता )

शारदीय नवरात्र पुष्प १ ( जन्मदात्री आई आणि भारत माता )

*शक्तीची साधना आणि उपासना म्हणजेच नवरात्री*


ऊर्जा, चैतन्य म्हणजेच जीवन... चैतन्याचा सोहळा, उर्जेचे प्रकटीकरण म्हणजे नवरात्री. मात्रूदेवो भव... माता हे ऊर्जेचे पहिले रूप. तिच्यामुळे आम्ही हे जग बघितले. तिला त्रिवार वंदन. जिवापाड प्रेम करणाऱ्या आईची अनेक रूपे आम्ही अनुभवतो. प्रेम करणारी, काळजी करणारी, गहिवरणारी आई आणि प्रसंगी रुद्रावतार धारण करणारी, धीर देणारी, कुटुंबाला सावरणारी सुद्धा आईच. प्रसंगी बाळाला पाठीशी बांधून शत्रूशी लढा देणारे झाशीच्या राणीचे रूप सुद्धा आईचेच.


आमचे हे राष्ट्र म्हणजे केवळ जमिनीचा एक तुकडा नाही देश म्हणजे मातेचे स्वरूप.. म्हणुनच आम्ही देशाचा उल्लेख भारतमाता असा करतो. या राष्ट्राच्या प्रगतीची जबाबदारी आम्हा सगळ्यांची आहे. देहापासून देवापर्यंत जाताना मध्ये देश असतो, असे बाळकडू आम्हाला आहे. 


भारताने कायमच विश्व कल्याणाचा विचार केला आहे हीच आमची परंपरा आहे. 

परंतु सज्जनांचे रक्षण आणि दुर्जनांवर वचक असेल तरच समाज स्वस्थ असतो. हीच आश्वासकता आमची लोकशाही देते... हीच आमची परंपरागत शिकवण आहे.


ऊर्जा, शक्ती ही मातृशक्तीची रूपे आहेत. शिव म्हणजे सत्य आणि शक्ती म्हणजे चैतन्य. शक्ती नसेल तर सत्य एकाकी पडते. आणि सत्यच नसेल तर शक्ती योग्य मार्गाकडे जात नाही. म्हणूनच शिव आणि शक्तीचा अभूतपूर्व संगम म्हणजे कार्यसिद्धी. 


कुटुंबासाठी झटणारी, कुटुंबाला सावरणारी, धीर देणारी, उद्यमी, सहनशील असणारी मातृशक्ती राष्ट्ररक्षणासाठी दुर्गा मातेच्या रूपात धाऊन येते. पृथ्वीला, देशाला उपद्रव  करणाऱ्या असुरशक्ती पूर्वी होत्या आजही आहेत. अशा विध्वंसक शक्ती वेगवेगळ्या रूपात आणि स्वरूपात आपले उपद्रवमूल्य दाखवून देत असतात. त्यामुळे थोडीफार सामाजिक घडी सुद्धा विस्कळीत होते. अशावेळी महिषासुरमर्दिनी उग्र स्वरूपात प्रकट होते.


या स्वरूपाची साधना म्हणजे नवरात्री.. उपवास करणे, दर्शन, याबरोबरच राष्ट्रभक्तीचा जागर म्हणजेच नवरात्री. कुठेतरी खोलवर दडून बसलेली राष्टचेतना प्रत्यक्षात जागृत अवस्थेत आणण्यासाठीचा सुवर्णकाळ म्हणजे नवरात्री. आमच्या समज जीवनाला दिशा देण्याचा काळ म्हणजे नवरात्री.. आमच्या समाज बांधवांशी आम्ही एकरूप आहोतच परंतु ही जाणीव प्रत्यक्ष एकत्र येऊन परस्परांना करून देण्याचा चैतन्य काळ म्हणजे नवरात्री. केवळ देश नव्हे तर अखिल धरा,पृथ्वी म्हणजे आमच्यासाठी धरणीमाता आहे. 


म्हणूनच पहिले पुष्प हृदयस्वरूप जन्मदात्या आईसाठी आणि आम्हाला पोसणाऱ्या आमच्या प्राणप्रिय भारतमातेसाठी..तुझे कारणी देह माझा पडावा एवढीच ईच्छा आहे...



भारत माता की जय 

राजाधिराज प्रभू रामचंद्र की जय 

महारुद्र हनुमान की जय.

जय जय रघुवीर समर्थ 


श्री. गुंजन हरी देव, 

सातारा

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी