शारदीय नवरात्र पुष्प २ ( रामवरदायिनी तुळजाभवानी माता)

शारदीय नवरात्र पुष्प २ ( रामवरदायिनी तुळजाभवानी माता) 


तुझा तू वाढवी राजा। शीघ्र आम्हासी देखता।


परकीय आक्रमणाचा महाभयंकर काळ...

आक्रमकांच्या घोड्यांच्या टापाखाली अवघा महाराष्ट्र होरपळून निघत होता... उभी पिके कापून नेली जात होती... आयाबाहिणी सुरक्षित नव्हत्या. औदासिन्य पसरले होते. सर्वांनाच आधार उरला नव्हता. त्या काळात समर्थ तुळजाभवानीला साकडे घालतात, हे  माते,  आता आमची सहन शक्ती संपत आलेली आहे, तू लवकर कृपा कर आणि या भूमीचे रक्षण करणाऱ्या राजाला बळ दे. तू दुर्गारुपात अनेक असुरांचा संहार केलेला आहेस हे आम्ही ऐकले आहे. पण आता नुसते ऐकणे नको प्रत्यक्ष प्रचिती दाखव.


तुळजा भवानीच्या कृपेने महाराष्ट्र भूमीचे भाग्य पलटले. शिवछत्रपतींच्या रूपात आमचे तारणहार प्रकटले. शिवछत्रपती आमचा श्वास आहेत. आमचा प्रत्येक श्वास केवळ त्यांच्या कृपेमुळे आहे. शिवछत्रपतींच्या पावन पदस्पर्शाने पुनीत झालेली माती आम्ही मोठ्या अभिमानाने कपाळावर मिरवतो.


आमच्या लेकीबाळी लेचेपेच्या नाहीत, त्या जिजाऊंच्या लेकी आहेत. त्या साक्षात रणरागिणी झाशीच्या राणीचे रूप आहेत. कुटुंबाला भक्कम आधार देता देता राष्ट्राला सावरण्याचे कसब त्यांच्या अंगी आहे. कोणताही काळ असला तरी अशी अराजक तत्व त्रास देत असतातच. त्यामुळे सज्जनांची शक्ती वृद्धिंगत व्हायला हवी. मनुष्याने कायम सजग असायला हवे... सज्जनशक्तीचा वचक असायला हवा...यासाठी प्रत्येकाने स्वतःचे योगदान द्यायला हवे.. नुसते मौन बाळगून चालणार नाही. यामुळे वाईट हेतूने कोणीही आणि कितीही अडचणी निर्माण केल्या तरी देश सामर्थ्याने उभा राहील.


प्रपंची आमुचे कुळी। तुळजा कुलदेवता।

नेणता ऐकिले होते। जाणता स्मरले मनी।

उदंड ऐकिले होते। रामासी वरू दिधला।

मी दास रघुनाथाचा। मजही वरदायिनी।

एकची मागणे आता। द्यावे ते मज कारणे।

तुझा तू वाढवी राजा। शीघ्र आम्हासी देखता।

दुष्ट संहारिले मागे। ऐसे उदंड ऐकतो।

परंतु रोकडे काही। मूळ सामर्थ्ये दाखवी।

रामदास म्हणे माझे। सर्व आतुर बोलणे।

श्री तुळजे माते। इच्छा पूर्ण ची ते करी।।


आमची मातृशक्ती लक्ष्मीच्या स्वरूपात वैभवदायी आहे.... माता दुर्गेच्या रूपात समाजाचे रक्षकवच आहे...देवी सरस्वतीच्या रूपात ज्ञानाचा भक्कम पाया आहे...




नवरात्रीच्या निमित्ताने संपूर्ण मातृशक्तीला त्रिवार वंदन.... भारत माता की जय.. भवानी माता की जय 


श्री.गुंजन हरी देव, सातारा

Comments

Popular posts from this blog

मुखी घास घेता करावा विचार

शतदा प्रेम करावे

वृक्षवल्ली आम्हां सोयरी